काँग्रेसचा बिगुल!
By Admin | Updated: August 14, 2014 03:45 IST2014-08-14T03:45:33+5:302014-08-14T03:45:33+5:30
माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांना समन्वय समिती व बंडाच्या पवित्र्यात उतरलेले नेते नारायण राणे यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले

काँग्रेसचा बिगुल!
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक समन्वय समिती, प्रदेश निवडणूक समिती, जाहीरनामा समिती, प्रचार समिती तसेच प्रसिद्धी समिती अशा पाच समित्यांची घोषणा करून काँग्रेस पक्षाने बुधवारी निवडणुकीचा बिगुल फुंकला. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांना समन्वय समिती व बंडाच्या पवित्र्यात उतरलेले नेते नारायण राणे यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
तथापि निवडणुकीत शक्तिमान समजल्या जाणाऱ्या खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यांच्या समन्वय समितीमध्ये मुख्ममंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना थेट सहभागी करून न घेता ते या समितीचे एक भाग असतील, असे आदेशात स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांना याशिवाय आणखी एका तर राणे यांना दोन समित्यांमध्ये सदस्य म्हणूनही सहभागी करून घेण्यात आले.
पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी या समित्यांची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २४ सदस्यांची प्रदेश निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सरचिटणीस मुकुल वासनिक, गुरुदास कामत, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, अशोेक चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव देशमुख, विलास मुत्तेमवार, प्रिया दत्त, जनार्दन चांदुरकर, पतंगराव कदम, नसीम खान, राजीव सातव, कृपाशंकर सिंग, माणिकराव गावित यांच्यासह सात विविध समित्यांचे अध्यक्ष या समितीचे सदस्य आहेत. ११ सदस्यांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नेमण्यात आले. या समितीमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा, गुरुदास कामत, मुंबई प्रदेश अध्यक्ष जनार्दन चांदुरकर, वनमंत्री पतंगराव कदम, खा़ हुसेन दलवाई, कमलाताई व्यवहारे, तर समिती निमंत्रकपदी शरद रणपिसे यांना नेमण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)