Jairam Ramesh: काँग्रेसने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आवाहनदेखील केले आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर पोस्ट केले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझाबाबतचा प्रस्ताव अस्वीकार्य आहे. मोदी सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी.
मोदी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी- काँग्रेसगाझाच्या भविष्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार विचित्र, धोकादायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. पॅलेस्टिनी लोकांच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याच्या पूर्ण कायदेशीर आकांक्षांची पूर्तता करणारा आणि इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित करणारा दोन देशांचा उपाय, हाच मध्य पूर्वेतील चिरस्थायी शांततेचा एकमेव आधार आहे. मोदी सरकारला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. इतर देशांनी आधीच आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, असे काँग्रेस नेते म्हणाले.
गाझाबाबत ट्रम्प सरकारने काय निर्णय घेतलाय?अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (4 फेब्रुवारी) म्हटले की, अमेरिका गाझा पट्टीवर आपली मालकी प्रस्थापित करेल. अमेरिका गाझा पट्टी आपल्या ताब्यात घेईल आणि तेथे आर्थिक विकास करेल, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार मिळेल. मात्र, तिथे कोणाला राहण्याची परवानगी दिली जाईल, याबाबत फारशी माहिती दिली नाही.