संख्याबळाअभावी धर्मनिरपेक्ष पक्षांत संभ्रम
By Admin | Updated: May 31, 2014 06:25 IST2014-05-31T06:25:50+5:302014-05-31T06:25:50+5:30
६ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला असताना अत्यल्प संख्याबळामुळे बिगर संपुआ आणि बिगर रालोआ पक्षांना काय करावे हेच सुचेनासे झाले आहे.

संख्याबळाअभावी धर्मनिरपेक्ष पक्षांत संभ्रम
फराज अहमद, नवी दिल्ली -१६ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी उरला असताना अत्यल्प संख्याबळामुळे बिगर संपुआ आणि बिगर रालोआ पक्षांना काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. येत्या काही दिवसांत यापैकी अनेक पक्ष पुढील वाटचाल ठरविण्यासाठी बैठका घेतील. बीजद, अण्णाद्रुमक, तृणमूल काँग्रेस वगळता सर्व पक्ष एकेरी अंकात आकुंचित झाले आहेत. १५ व्या लोकसभेत २० सदस्य असलेला जदयू अस्तित्वाची लढाई लढत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांच्यावर राजीनामा देण्याचा आणि नवीन तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी दबाव निर्माण केला आहे. जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकर बैठक होईल आणि पुढची वाटचाल ठरविण्यात येईल. तसेच राज्यसभेसाठी नाव निश्चित केले जाईल, असे जदयूचे राष्ट्रीय सरचिटणीस जावेद रझा म्हणाले. जदयूची लोकसभा सदस्यांची संख्या दोनवर आली आहे. गेल्या लोकसभेत २२ खासदार असलेला समाजवादी पक्षदेखील अशाच संकटाचा सामना करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आपल्या कुटुंबातील तीन सदस्यांसह लोकसभेत प्रवेश करीत आहेत. त्यांचा कोणत्याही अनुयायी सभागृहात नसेल. त्यांच्यासोबत कोण बसेल याबाबत त्यांनी एक आढावा बैठक घेतली, पण त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दहा वर्षांपूर्वी डावे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारचे धोरण निश्चित करीत होते आणि संपुआ-१ सरकारची दिशा ठरवित होते. हे सरकार २००८ ला गेले. त्यावेळी त्यांचे ६० खासदार होते आणि पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा राज्यात सरकार होते. विद्यमान लोकसभेत डाव्याचे संख्याबळ ११ वर आले आहे. यामध्ये सीपीएमचे नऊ आणि सीपीआय, आरएसपीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आरएसपीचा उमेदवार केरळमधून डावी आघाडीचा उमेदवार म्हणून नव्हे तर काँग्रेसचा घटकपक्ष म्हणून निवडून आला. राष्ट्रीय जनता दलापुढे देखील गंभीर संकट आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी ठरल्याने संसदेत जाऊ शकत नाहीत. त्यांची पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा भारती यांनी लोकसभा निवडणूक लढवली, पण दोघीही पराभूत झाल्या. राजदच्या तिकिटावर जे चार खासदार निवडून आले. त्यापैकी पप्पू यादव आणि मोहम्मद तस्लिमुद्दीन यांच्याशी लालू यांचे फारसे जमत नाही. दिल्लीतील बंगला आपल्याकडे राहावा म्हणून लालूप्रसाद यादव आपल्या पत्नीला राज्यसभेत पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण नितीशकुमार यांनी लालूांना नकार दिल्याचे समजते. अशा परिस्थितीत लालूप्रसाद यांना दिल्लीचा आणि राष्ट्रीय राजकारणाचा काही काळासाठी निरोप घ्यावा लागण्याची शक्यता आहे. डावे देखील अस्तित्वाची लढई लढत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी त्सुनामीचा संसदेत आणि संसदेबाहेर सामना करण्यासाठी पुढे काय करावे आणि काय रणनीती असावी, याबद्दल यापैकी कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाला काही सुचत नाही.