बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यारून सध्या वातावरण तापले आहे. मतदार याद्यांच्या पडताळणीनंतरही काही चुका समोर येत आहेत. दरम्यान, बिहारमधील सिवान जिल्ह्यातील अरजानीपूर गावातील एका महिला मतदाराचं वय १२४ वर्षे दाखवल्याने या प्रकाराची चर्चा पाटण्यापासून दिल्लीपर्यंत झाली. अखेर या महिलेनेच समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.
अरजानीपूर गावातील मिंता देवी असं या महिलेचं नाव असून, तिचं नाव पहिल्यांदाच मतदार यादीमध्ये जोडण्यात आलं होतं. मात्र तिचं वय १२४ वर्षे दर्शवण्यात आल्याने शंका घेतली जात होती. मिंता देवी हीचं खरं वय ३५ वर्षे आहे. मात्र महिलेच्या मतदार ओळखपत्र आणि आधारकार्डवर १५ जुलै १९०० अशी जन्मतारीख नोंदवण्यात आली होती. त्यामुळे तिचं वय १२४ वर्षे असं नमूद करण्यात आलं होतं. ही बाब समोर येताच विरोधी पक्षांनी यावरून जोरदार हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षामधील अनेक खासदार संसद भवन परिसरामध्ये मिंता देवी यांचे फोटो आणि १२४ नॉट आऊट लिहिलेली टीशर्ट परिधान करून आले. यादरम्यान, सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सीवानचे डीएम आदित्य प्रकाश यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा प्रकार टायपिंग मिस्टेकमधून घडला आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना चुकीच्या नोंदी झाल्या. त्यामुळे १२४ वर्षे अशी वयाची नोंद झाली. मतदार पुनरीक्षणावेळीही ही चूक कायम राहिली. आता फॉर्म-८ च्या माध्यमातून सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता आठवडाभराच्या आत या वयामध्ये सुधारणा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्यांच्या वयाच्या नोंदीमध्ये चुका आहेत त्यांनीही त्याबाबत आक्षेप नोंदवून त्या दुरुस्त करून घ्याव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, मिंता देवीचे पती धनंजय कुमार सिंह यांनी सांगितले की, ही एक तांत्रिक चूक आहे. त्यात सुधारणा कऱण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. तर लोकसंख्या अधिक असल्याने अशा चुका होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.