मेशी परिसरात पर्जन्यमान घटल्याने चिंता

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

डाळींबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर; बळीराजा संकटात

Concerns due to the decrease in rainfall in the moani area | मेशी परिसरात पर्जन्यमान घटल्याने चिंता

मेशी परिसरात पर्जन्यमान घटल्याने चिंता

ळींबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर; बळीराजा संकटात

मेशी (एकनाथ सावळा) : मेशीसह परिसरात गेल्या तीन वर्षांपासून पर्जन्यमान घटत असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व बिघडलेल्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे परिसरातील डाळींबबागा नामशेष झाल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी बागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याही शेवटच्या घटका मोजत आहेत.
एकेकाळी नगदी पीक म्हणून डाळींबबागांकडे पाहिले जायचे; मात्र घटते पर्जन्यमान, बिघडलेले हवामान व अफाट खर्च करूनही पदरी निराशाच देत असल्यामुळे शेतकर्‍यांनी डाळींबबागा काढून टाकणे पसंत केले. कारण महागडी औषधे फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नाही अन् आलीच तर ऐनक्षणी निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो अन् डाळींबबागा उद्ध्वस्त करतो. या भागात कांदा पिकविणेही कठीण झाले आहे. अशावेळी डाळिंबासारखे नाजूक पीक घेणे अधिकच कठीण होते. एकेकाळी या परिसरात डाळींबबागांचे मोठे पेव आले होते. परंतु आता क्वचितच बागा दिसत आहेत. बाजारभावही स्थिर नसतो. सध्या बारमाही हवामान खराब असते. ऋतुमानात समतोल राहिलेला नाही. कधी धुके, बेमोसमी पाऊस, गारपीट, ढगाळ हवामान हे नेहमीचेच पाचविला पुजलेले आहे. त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे. यावर्षी रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार आहे. गहू, हरभरा, कांदा अगदीच नगण्य स्वरूपात पिकणार आहे. अन्नधान्यातील रब्बी हंगामातील गहू हे पीकसुद्धा दुर्मीळ झाले आहे. अत्यल्प पाऊस, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, निसर्गाचा लहरीपणा, बाजारभावातील चढउतार यामुळे शेती करणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. पुन्हा एकदा चांगला पाऊसपाणी होऊ दे, निरोगी वातावरण राहू दे व बळीराजा सुखी होऊ दे, अशी आर्त प्रार्थना सगळीकडे केली जात आहे.

Web Title: Concerns due to the decrease in rainfall in the moani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.