ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - दिल्लीतील ख्यातनाम महाविद्यालयात शिकणा-या तरुणीने लैंगिक शोषण व मारहाण केल्याप्रकरणी आईविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. आई मुलीचे शोषण करुच शकत नाही असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पिडीत मुलीला शेवटी कोर्टात याचिका दाखल करावी लागला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका ख्यातनाम महाविद्यालयात शिकणा-या प्रेरणा (नाव बदलेले) या तरुणीने कोर्टात आईविरोधातच याचिका दाखल केली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मी लहान असल्यापासून माझ्या आईवडिलांनी माझा मानसिक व शारीरिक छळ केला. माझ्या आईने वारंवार माझे लैंगिक शोषण केले. महाविद्यालयात गेल्यावर हे प्रकार वाढत गेले असा तिचा आरोप आहे. एकदा मी खोलीत एकटी झोपली असता आईने माझ्याशी गैरवर्तन केले, मी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असेही तिने याचिकेत म्हटले आहे. सध्या पिडीत तरुणी तिच्या आईवडिलांपासून विभक्त होत मैत्रिणींसोबत राहते. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत आईविरोधात तक्रार कशी दाखल करता येईल असा सवाल कोर्टाने पिडीत मुलीच्या वकिलांना विचारला आहे. या कायद्यात आईविरोधात तक्रार दाखल करण्याची तरतूद नसल्याने हा गोंधळ होत असल्याचे पिडीत मुलीच्या वकिलांनी सांगितले. पिडीत तरुणीच्या आईने मुलीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.