दुष्काळ पाहणीसाठी सेना-भाजपामध्ये स्पर्धा

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:22+5:302015-08-28T23:37:22+5:30

Competition in Army-BJP for Drought Analysis | दुष्काळ पाहणीसाठी सेना-भाजपामध्ये स्पर्धा

दुष्काळ पाहणीसाठी सेना-भाजपामध्ये स्पर्धा

>मराठवाड्याकडे लक्ष : मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे दौरा करणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी करून निर्णय घेण्यासाठी आता शिवसेना-भाजपामध्ये स्पर्धा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ते ३ सप्टेंबरदरम्यान तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सवापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी भागांना भेटी देणार आहेत.
मुख्यमंत्री बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. त्यादरम्यानच मंत्रिमंडळ बैठक होऊन मराठवाड्यासाठी उपाययोजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर २३ व २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर २४ ऑगस्टला मराठवाडा अनुशेष बैठकीतही दुष्काळ गाजला. त्यानंतर आता पुन्हा युतीमध्ये दुष्काळी दौर्‍याचे आयोजन होत आहे. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी ठाकरे गणेशोत्सवापूर्वी मराठवाड्याचा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.
विभागीय पातळीवरील सर्व अहवाल, पाणीसाठा, खरीप हंगामाची स्थिती याचा अहवाल रोज शासनाकडे जात आहे. मात्र त्यानंतरही दौरे आणि पाहणीचा फार्स सत्ताधारी करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. खरीप हातचा गेला आहे. रब्बीसाठी तरी तातडीने निर्णय घेऊन वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत नजर पैसेवारीचे प्राथमिक अवलोकन होईल.
१ ते ३ सप्टेंबरपासून मुख्यमंत्री दौरा करणार असल्यामुळे ३१ ऑगस्टला विभागीय आयुक्तालयात नियोजन बैठक होणार आहे. बीडमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असणार आहे. लातूर किंवा उस्मानाबादपैकी एका ठिकाणी ते मुक्काम करणार आहेत. शेतकरी भेटी, चाराटंचाई, प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री पाहणी करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Competition in Army-BJP for Drought Analysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.