भाजपची सत्ता येताच जातीय दंगली वाढल्या - सोनिया गांधी
By Admin | Updated: August 12, 2014 14:02 IST2014-08-12T13:37:14+5:302014-08-12T14:02:34+5:30
देशात भाजपची सत्ता येताच जातीय दंगलीचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपची सत्ता येताच जातीय दंगली वाढल्या - सोनिया गांधी
ऑनलाइन टीम
कोच्ची, दि. १२ - देशात भाजपची सत्ता येताच जातीय दंगलीचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दंगली घडवून देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जातीय दंगलीवरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका केल्यावर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मोदींवर हल्लाबोल केला. मंगळवारी केरळमधील एका कार्यक्रमात सोनिया गांधींनी सत्ताधा-यांवर टीका केली. 'देशात नवीन सरकार येऊन ११ आठवड्यांचा कालावधी लोटला असून या कालावधीत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यांमध्ये तब्बल ६०० दंगली घडल्या आहेत' असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. दंगलीचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असून यूपीएच्या कार्यकाळात दंगलीचे प्रमाण कमीच होते असा दावाही त्यांनी केला.