गोव्यात माध्यमावर अंकूष ठेवण्यास समिती - कॉंग्रेस
By Admin | Updated: July 6, 2016 17:06 IST2016-07-06T17:06:25+5:302016-07-06T17:06:25+5:30
गोव्यातील केबल टीव्ही चॅनलसवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारकडून काढण्यात आलेल्या देखरेख समितीत माध्यमांशी संबंधीत सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही.

गोव्यात माध्यमावर अंकूष ठेवण्यास समिती - कॉंग्रेस
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ६ : गोव्यातील केबल टीव्ही चॅनलसवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारकडून काढण्यात आलेल्या देखरेख समितीत माध्यमांशी संबंधीत सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही समिती टीव्ही माध्यमांवर अंकूष ठेवण्यासाठीच नियुक्त करण्यात आल्याची शक्यता बळावत आहे. कॉंग्रेसने या समितीला तीव्र हरकत घेतली आहे.
सरकारने हल्लीच स्थानिक टीव्ही चॅनल्सवर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाचे सचीव दौलत हवलदार यांच्या नियुक्त करण्यात आलेल्या समितीत प्रत्यक्ष टीव्ही माध्यमात वावरणाऱ्यांना स्थान देण्यात आलेले नाही. टीव्ही माध्यमांचा एकही प्रतिनिधी या समितीवर नाही. एवढेच नव्हे तर पत्रकारितेत असलेल्या प्रतिनिधींनाही त्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही समिती स्थापन करण्याच्या हेतुबद्दल कॉंग्रेसने संशय व्यक्त केला आहे.
अशी समिती नियुक्त करण्यामागचा हेतू सरकारने अगोदर स्पष्ट करावा. तसेच नियुक्त करण्यात आलेली समिती रद्द करून पारदर्शी प्रक्रिया पाळून नव्याने समिती नियुक्त करा. त्यासाठी माध्यमांनाही विश्वासात घ्या. माध्यमांना अंधारात ठेवून नियुक्त करण्यात आलेल्या समितीला कॉंग्रेसचा प्रखर विरोध राहील असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अविनाश तावारीस यांनी सांगितले. स्थानिक केबल टीव्ही चेनल्स वरू प्रसारीत होणाऱ्या बातम्या आणि जाहीराती यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सरकारे घोटाळे व अकार्यक्षमता लोकांच्या नजरेस आणण्याचे काम टीव्ही चॅनल्स करीत असल्यामुळेच हा खटाटोप असल्याचे त्यांनी सांगितले.