केजरीवालांना आयोगाची नोटीस
By Admin | Updated: January 18, 2015 02:02 IST2015-01-18T02:02:41+5:302015-01-18T02:02:41+5:30
आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

केजरीवालांना आयोगाची नोटीस
नवी दिल्ली : ‘भाजपा दिल्लीत सांप्रदायिक हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न करीत आहे’, असा आरोप करून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आयोगाने केजरीवाल यांना २० जानेवारीच्या दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत उत्तर दिले नाही तर आयोग विनाविलंब आपला निर्णय घेईल.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली. ‘अशा प्रकारचा आरोप करून तुम्ही (केजरीवाल) आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचे सकृतदर्शनी दिसते’, असे या नोटिसीत म्हटले आहे. दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्यांसाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता. आयोगाने त्यांच्या या आरोपाचाही नोटिसीत उल्लेख केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)