RSS Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभरात 'शताब्दी वर्ष' मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. याच निमित्ताने कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे आयोजित एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हजेरी लावली. यावेळी, संघात मुस्लिमांना प्रवेशाची परवानगी आहे का, या एका महत्त्वाच्या आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट उत्तर दिले, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. तो फक्त धोरणांना पाठिंबा देतो, पक्षांना नाही. संघाची विचारसरणी सर्वसमावेशक आहे आणि ही त्याची कार्यशैली आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं. संघात मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मीयांना प्रवेशाची परवानगी आहे का, या प्रश्नावर मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, संघात कोणत्याही विशिष्ट जातीला (ब्राह्मण किंवा अन्य) किंवा पंथाला (मुस्लिम किंवा ख्रिश्चन) स्वतंत्रपणे मान्यता नाही.
भागवत म्हणाले, "संघात कोणत्याही ब्राह्मण, कोणत्याही अन्य जातीला, कोणत्याही मुसलमान किंवा ख्रिश्चनाला ओळखीच्या आधारावर प्रवेश दिला जात नाही. इतर कोणत्याही जातीला स्वतंत्रपणे मान्यता दिली जात नाही. लोकांना फक्त हिंदू म्हणून स्वीकारले जाते. म्हणून, वेगवेगळ्या धर्माचे लोक संघात सामील होऊ शकतात, परंतु त्यांनी त्यांची वेगळी ओळख मागे सोडली पाहिजे. तुमचे वेगळेपण स्वागतार्ह आहे, परंतु जेव्हा तुम्ही शाखेत याल तेव्हा तुम्ही भारतमातेचा पुत्र आणि या हिंदू समाजाचा सदस्य म्हणून याल."
संघ सर्व भेदभावांपासून अलिप्त राहून कार्य करतो, हे स्पष्ट करताना भागवत पुढे म्हणाले की, "मुसलमान शाखेत येतात, ख्रिश्चन शाखेत येतात, जसे तथाकथित हिंदू समाजातील अन्य जातींचे लोकही शाखेत येतात. पण आम्ही त्यांची संख्या नोंदवत नाही आणि ते कोण आहेत, हे विचारतही नाही. आम्ही सर्व भारत मातेचे पुत्र आहोत. संघ याच पद्धतीने कार्य करतो."
पाकिस्तानवर कठोर भूमिका
याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरही आपले मत मांडले. "भारत नेहमीच पाकिस्तानसोबत शांतता ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण पाकिस्तानला ती नको आहे. जोपर्यंत पाकिस्तानला भारताचे नुकसान करण्यात समाधान मिळत राहील, तोपर्यंत ते हे करतच राहतील. त्यांच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांना आपल्याला कडक प्रत्युत्तर द्यावे लागेल. पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा अर्थ असा नाही की भारताने स्वतःहून कोणतेही करार तोडावेत. जर पाकिस्तानने करार मोडले, तर त्यांना यश मिळणार नाही, उलट ते स्वतःसाठीच अडचणी निर्माण करतील," असा इशाराही भागवत यांनी दिला.
Web Summary : RSS chief Mohan Bhagwat stated that while Muslims and Christians can join RSS shakhas, they must identify as sons of Bharat Mata and members of Hindu society, setting aside separate identities. He emphasized inclusivity, but within a Hindu framework.
Web Summary : आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने कहा कि मुस्लिम और ईसाई आरएसएस शाखाओं में शामिल हो सकते हैं, लेकिन उन्हें भारत माता के पुत्रों और हिंदू समाज के सदस्यों के रूप में पहचान बनानी होगी, अपनी अलग पहचान को त्यागना होगा। उन्होंने हिंदू ढांचे के भीतर समावेशिता पर जोर दिया।