तिरुवनंतपुरम - गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि आसपासच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासाची पाळेमुळे आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी भारतीय तपास यंत्रणेने तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी दोन तरुणांना केरळमधील कासरगोड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका तरुणाला पलक्कड येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या दोन तरुणांचा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार जहरान हाशीमसोबत थेट संपर्क होता. दरम्यान, या तरुणांची एनआयएच्या मुख्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आठ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला होता.
कोलंबो साखळी बॉम्बस्फोट : केरळमधून तीन युवक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:53 IST