Operation Sindoor: आम्हाला आमच्या लेकीचा अभिमान आहे. आता मनात हेच येते की, आम्हाला संधी मिळाली तर पाकिस्तानचा खात्मा करून टाकेन. जगाच्या नकाशावर राहण्याची पाकिस्तानची लायकी नाही, अशी प्रतिक्रिया कर्नल सोफिया कुरेशी यांच्या वडिलांनी दिली आहे. सोफिया कुरेशी यांच्या वडिलांचे नाव ताज मोहम्मद कुरेशी असून, बांगलादेश मुक्तिसंग्रामच्या लढाईत त्यांनी सहभाग घेतला होता.
गुजरातच्या रहिवासी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्म्सच्या अधिकारी आहेत. २००६ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतही काम केले आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांना नऊ वर्षाचा मुलगा आहे. मार्च २०१६ मध्ये बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सोफिया कुरेशी यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.
सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत
भारतीय लष्करात जाऊन सेवा देणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. त्यांचे वडील, आजोबा भारतीय लष्करात होते. मीही भारतीय सैन्यात होतो. आता माझी लेक हीच परंपरा पुढे घेऊन जात आहे. आम्ही फक्त देशाचा विचार करतो. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत आणि मग बाकी सर्व, असेही ताज मोहम्मद कुरेशी यांनी नमूद केले.
दरम्यान, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. याची माहिती तिन्ही दलांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याबद्दल भाष्य केले. सोफिया यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनीही काही काळ सैन्यात सेवा बजावली आहे. यामुळे सैन्यात जायचे त्यांचे स्वप्न होते. १९९९ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीद्वारे सैन्यात कमिशन मिळाले.