नव्या वर्षात सीएनजी, घरगुती पीएनजी स्वस्त; १ जानेवारीपासून दरात होणार २ ते ३ रुपये कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:23 IST2025-12-18T09:22:56+5:302025-12-18T09:23:45+5:30
सीएनजी आणि घरगुती पीएनजी यांच्या किमतीत प्रति युनिट २ ते ३ रुपये कपात होणार आहे.

नव्या वर्षात सीएनजी, घरगुती पीएनजी स्वस्त; १ जानेवारीपासून दरात होणार २ ते ३ रुपये कपात
नवी दिल्ली: देशभरातील ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार असून सीएनजी आणि घरगुती पीएनजी यांच्या किमतीत प्रति युनिट २ ते ३ रुपये कपात होणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) जाहीर केलेली नवी दर रचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.
पीएनजीआरबीचे सदस्य ए. के. तिवारी यांनी सांगितले की, नव्या एकत्रित दर रचनेत राज्य व कर रचना यानुसार ग्राहकांची बचत होईल. यासाठी दर झोनची संख्या तीनवरून दोन करण्यात आली आहे. २०२३ मध्ये लागू असलेल्या जुन्या पद्धतीत अंतरानुसार वेगवेगळे दर होते.
सर्वसामान्यांना दिलासा
१. पहिला झोन देशभरातील सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी लागू राहील. या झोनसाठी दर ५४ रुपये निश्चित करण्यात आला असून तो आधीच्या ८० व १०७रुपयांच्या तुलनेत कमी आहे.
२. या बदलाचा फायदा ४० सिटी गॅस वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रातील ३१२ भागांतील ग्राहकांना होईल. सीएनजी वापरकर्ते व घरगुती स्वयंपाकासाठी पीएनजी वापरणाऱ्या कुटुंबांना याचा थेट लाभ मिळेल.