मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 20:12 IST2025-07-06T20:05:37+5:302025-07-06T20:12:32+5:30
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभ्यार्थांना रक्कम वाढवून मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं.

मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
Ladli Behna Yojana: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडली बहन योजनेसंर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या दिवाळीपासून राज्यातील १.२७ कोटी महिलांना लाडली बहना योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. महिलांसाठी २७ हजार कोटी रुपयांचे विशेष बजेट तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले. त्यापैकी १८,६९९ कोटी रुपये लाडली बहना योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना मोठी भेट जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेतील १.२७ कोटींहून अधिक महिला लाभार्थ्यांना दिवाळीनंतर दरमहा १५०० रुपयांची मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. मुख्यमंत्री मोहन यादव सिंगरौलीतील सराई येथे महिला सक्षमीकरण आणि आदिवासी अभिमान परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले की, "लाडली बहना योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी २५० रुपये अधिक मिळणार आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात १२५० रुपयांऐवजी १५०० रुपये जमा होतील. तसेच दिवाळीपासून या योजनेची रक्कम २५० रुपयांनी वाढवली जाईल. त्यानंतर, महिलांच्या खात्यात १२५० रुपयांऐवजी १५०० रुपये जमा होऊ लागतील. लाडली बहना योजनेच्या १.२७ कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जाईल."
लाडली बहना योजनेच्या रकमेत वाढ जाहीर करताना, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडली लक्ष्मी योजनेबद्दलही सांगितले. आतापर्यंत लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत एकूण ५१ लाख मुलींना लाभ मिळाला आहे. यासाठी त्यांना ६७२ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत ९,००० हून अधिक आदिवासी कुटुंबांना जमिनीचे हक्क देण्यात आले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्री यादव यांनी दिले.
दरम्यान, मध्य प्रदेशात लाडली बहना योजना १० जून २०२३ रोजी सुरू झाली होती. त्यावेळी केंद्रीय कृषीमंत्र शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना सुरू केली तेव्हा महिलांना १००० रुपये देण्यात येत होते. त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे १२५० रुपये करण्यात आले. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेजर ठरली. त्यामुळे महायुतीने महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना सुरु केली आणि विधानसभेत मोठं यश मिळवलं.