हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीनंतर प्रचंड नुकसान झालं आहे. सुमारे ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मंडीच्या करसोग आणि धर्मपूरमध्ये ढगफुटीमुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १६ जण बेपत्ता आहेत. तसेच ११७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रस्ते, पूल, घरं वाहून गेले आहेत आणि पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
१८ घरांचं नुकसान झालं आहे, १२ गोठे आणि ३० गुरं वाहून गेली आहेत. मंडी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. गोहर परिसरात ४ ठिकाणी ढगफुटी झाली, ज्यामध्ये २ घरं उद्ध्वस्त झाली. अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, परंतु अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. धर्मपूरमध्ये ढगफुटी झाली तेव्हा ६ घरं पुरात बुडाली होती. ८ गोठेही उद्ध्वस्त झाले.
८०० कोटी रुपयांचं नुकसान
नदीला पूर आला आहे. हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात विध्वंस दिसून आला आहे, त्यात पहिल्या दोन आठवड्यात सुमारे ८०० कोटी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त आणि नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. बहुतेक भागात २ आणि ३ जुलै रोजी पाऊस पडेल.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
राज्यातील मंडी, कांगडा, बिलासपूर, हमीरपूर, चंबा, सोलन, शिमला या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, ज्यामध्ये मंडी जिल्ह्यातील पांडोहमध्ये १२३ मिमी, मंडीमध्ये १२० मिमी, शिमलामध्ये ११० मिमी, पालमपूरमध्ये ८० मिमी पाऊस पडला. उना, बिलासपूर, हमीरपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उना, बिलासपूर, मंडी, हमीरपूर, चंबा आणि कांगडा जिल्ह्यांतील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.