Chamoli Cloudburst:उत्तराखंडमधील चमोली येथे पुन्हा एकदा ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. चमोली जिल्ह्यातील देवल तहसीलमधील मोपाटा गावात ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. ढगफुटीमुळे घरे आणि गोठे ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेत दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. याआधीही उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. देवभूमीतील हवामानामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही दुःख व्यक्त केलं.
उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील देवल परिसरात गुरुवारी रात्री निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवले. मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोपाटा गावात प्रचंड नुकसान झाले. ढगफुटीनंतर काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढिगाऱ्यांमुळे चटवा पीपलजवळ बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ढग फुटल्यानंतर मातीचा ढिगारा इतक्या वेगाने आला की लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. गावात सर्वत्र ढिगाऱ्याचे दृश्य दिसत आहे. गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
ढगफुटीमुळे मोपाटा गावात प्रचंड नुकसान झाले. या अपघातात तारा सिंह आणि त्यांची पत्नी बेपत्ता असल्याचे वृत्त आहे, तर विक्रम सिंह आणि त्यांची पत्नी जखमी आहेत. स्थानिक गोशाळा ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे १५ ते २० जनावरे मृत्युमुखी पडल्याचेही समोर आलं. चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, मदत पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आहेत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बाधित भागातील लोकांना मदत करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत.
"चमोलीच्या देवल भागात आणि रुद्रप्रयागच्या बासुकेदार भागात ढगफुटीमुळे झालेल्या ढिगाऱ्यात काही कुटुंबे अडकल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. मी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि बचाव कार्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदार यांना प्रार्थना करतो," असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे चमोली जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. बद्रीनाथ महामार्गावर ढिगारा साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाने बाधित भागात पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत, पण पाऊस थांबेपर्यंत परिस्थिती सामान्य होण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे, केदार खोऱ्यातील अलकनंदा आणि मंदाकिनी देखील दुथडी भरून वाहत आहेत, अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.