प्रवासासाठी सर्वाधिक आरामदायक, ट्रॅफिकच्या समस्येवर मात करणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या लाईनवरील केबल चोरण्यात आल्या आहेत. यामुळे दिल्ली-नोएडा दरम्यान कीर्ति नगर व मोती नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. नोकरदार वर्गाला ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळेतच मेट्रो लाईन ठप्प झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
ब्लू लाईन मेट्रो आज उशिराने धावत आहे. दिल्ली मेट्रोची ही सर्वात व्यस्त मार्गिका आहे. प्रवाशांना जास्त वेळ मेट्रोची वाट पहावी लागणार आहे. यामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
बुधवारी रात्री मेट्रोची सेवा थांबल्यानंतर द्वारकेहून नोएडाला जाणाऱ्या लाईनवरील कीर्ति नगर आणि मोती नगर स्टेशन दरम्यानची केबल तारांसाठी चोरण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यातही अशीच एक घटना उघडकीस आली होती. रेड लाईनवरील झिलमिल ते मानसरोवर पार्क स्टेशन दरम्यानची केबल चोरीला गेली होती.