वर्गमित्रांनी घरात घुसून मैत्रिणीला जिवंत जाळले
By Admin | Updated: May 11, 2014 16:28 IST2014-05-11T16:28:07+5:302014-05-11T16:28:28+5:30
मध्य प्रदेशमध्ये तीन विद्यार्थ्यांनी एका मैत्रिणीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला व त्यात अपयशी ठरल्यावर तिला जिवंत जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वर्गमित्रांनी घरात घुसून मैत्रिणीला जिवंत जाळले
ऑनलाइन टीम
इंदौर, दि. ११ - मध्य प्रदेशमध्ये तीन विद्यार्थ्यांनी एका मैत्रिणीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला व त्यात अपयशी ठरल्यावर तिला जिवंत जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत ९६ टक्के भाजलेल्या त्या दुर्दैवी मुलीचा रविवारी मृत्यू झाला. मध्य प्रदेशमधील खरगौन जिल्ह्यातील ओझरा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरवां येथे बी- फार्मच्या शेवटच्या वर्षात शिकणारी तरूणी शनिवारी घरी एकटीच होती, त्याचवेळी तिचे तीन वर्गमित्र घरात घुसले व त्यांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्यांनी विरोध केला असता त्या तीन नराधमांनी तिच्यावर तेल टाकून तिला जिवंत जाळले.
त्या तरूणीला उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून तिला इंदौरे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र ९६ टक्के जळालेल्या त्या तरूणीचा रविवारी मृत्यू झाला.
मात्र मृत्यूपूर्वी तिने पोलिसांत आपला जबाब नोंदवला होता. पोलिसांनी याप्रकरणी अक्षय जोशी, अंकित राठोड व विशाल चौहान या तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.