नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:15 IST2025-07-14T06:15:17+5:302025-07-14T06:15:35+5:30
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे.

नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत विमा संरक्षण २ लाखांवरून थेट ४ लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा प्रस्ताव विचाराधीन आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे.
विमा रक्कम दुप्पट केल्यास या योजनेत आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा ठरेल. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी हा एक आर्थिक आधार ठरू शकेल. हा निर्णय सामाजिक सुरक्षेसाठी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पीएमजेजेबीवाय आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) या तब्बल ७४.६ कोटी लोकांचे कवच बनल्या आहेत. त्यामुळे देशात सर्वदूर भागात पोहोचण्यासाठी ते एक शक्तिशाली साधन बनले आहे. मात्र दुसरीकडे, ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका पीएमजेजेबीवाय योजनेच्या केवळ ३० टक्के नोंदणी लक्ष्य पूर्ण करू शकल्या आहेत.
योजनेची साधी रचना
पीएमजेजेबीवायचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेची साधी रचना. वय १८ ते ५० दरम्यान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एक बँक खाते असले की, वार्षिक प्रीमियम भरून विमा मिळविता येतो. भारत सध्या परवडणाऱ्या प्रीमियमबाबत समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असताना एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ही योजना भविष्यासाठी महत्वाची ठरु शकेल.
देशाचा विमा प्रवेश (सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये विम्याचे योगदान) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांवर आला आहे. जो या क्षेत्रात अधिक प्रयत्नांची गरज दर्शवितो.