राज्यघटनेला अभिप्रेत न्यायासाठी देशवासीयांनी सदैव कटिबद्ध राहावे; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:19 IST2025-12-18T09:14:17+5:302025-12-18T09:19:42+5:30
लोकमत पार्लमेंटरी अवॉर्डचा दिल्लीत दिमाखदार सोहळा, राज्यसभा व लोकसभेतील आठ कर्तबगार खासदारांचा गौरव

राज्यघटनेला अभिप्रेत न्यायासाठी देशवासीयांनी सदैव कटिबद्ध राहावे; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन
नवी दिल्ली: संविधानात अंतर्भूत असलेल्या मूल्यांप्रती आणि दूरदृष्टीप्रती कटिबद्ध राहून नागरिकांना राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने देशवासीयांनी सातत्याने पुढे जात राहावे, असे आवाहन देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांनी बुधवारी येथे केले.
राष्ट्रीय राजधानीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे लोकमत मीडिया समूहाच्या वतीने आयोजित सहाव्या लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरैशी, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड ज्युरी बोर्डचे अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या
सोहळ्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील आठ खासदारांना विविध श्रेणींमध्ये लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, लोकशाहीचे विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका हे तिन्ही स्तंभनागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. संविधानाने नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा अधिकार दिला आहे. संसदेकडून कायदे निर्मिती होत असताना न्यायपालिकेने त्या कायद्यांचे व अधिकारांचे संरक्षण केले आहे. यामागचा उद्देश देशातील असमानता कमी करून समानतेला चालना देण्याचा आहे.
कधी-कधी लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये मतभेद निर्माण होतात, न्यायाधीशांनाही निर्णय घेताना द्विधा अवस्था येते; मात्र सर्वांचा हेतू एकच असतो. नागरिकांना न्याय देण्याचा. त्यामुळे संविधानाच्या मूळ भावनेनुसार देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कटिबद्ध राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, खासदारांचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी देश सर्वांचा एकच आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी माजी सरन्यायाधीश गवई यांचे समाजासाठीचे योगदान गौरवास्पद असल्याचे नमूद केले. आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांप्रदायिक कट्टरता व जातीय उन्माद हे लोकशाहीचे शत्रू असल्याचे सांगितले. लोकमत समूह समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे गौरवोद्गार काढताना त्यांनी नागपुरात आयोजित सर्वधर्मीय परिषदेची आठवण सांगितली.
ज्युरी बोर्डचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी निर्वाळा दिला की, विजेत्यांची निवड पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात आली असून संसदबाहेर कोणत्याही संस्थेकडून दिले जाणारे हे सर्वाधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय दर्डा यांनी, तर आभार प्रदर्शन राजेंद्र दर्डा यांनी केले. यापूर्वी लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन श्वेता शुक्ला शेलगांवकर यांनी केले.
... जेव्हा मदतीला धावले मनोहरभाई पटेल
दिवंगत रा. सू. गवई दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आर्थिक अडचणीत होते. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नव्हते. तेव्हा, रा. सू. गवई यांनी प्रफुल्ल पटेला यांचे वडील मनोहरभाई पटेल यांच्याकडे मदतीची विनंती केली. तेव्हा, मदतीची तयारी दाखविताना पटेल यांनी गोंदियात घरी भोजन करण्याची प्रेमळ अट घातल्याचा प्रसंग न्या. गवई यांनी पुन्हा सांगितला.
'लोकमत'च्या वाचनाने सुरू होतो दिवस : न्या. गवई
विदर्भाशी नाते जपण्यासाठी आपण दररोज सकाळी सर्वप्रथम 'लोकमत' वाचतो, असे न्या. गवई म्हणाले. लोकमत परिवारासोबत आपुलकी शब्दबद्ध करताना त्यांनी माझे वडील रा. सू. गवई व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी सोबत राजकारण केले असे आवर्जून सांगितले.
ऋणानुबंधाचा हाच धागा पुढे नेते ते म्हणाले नागपूर-मुंबई विमानसेवा मर्यादित असल्याने तसेच रेल्वे आरक्षण मिळणे कठीण असताना, त्यांनी व त्यांचे वडील माजी नेते रा. सू. गवई यांनी डॉ. विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्यासोबत हावडा-मुंबई मेलच्या एसी-१ कोचमधून एकत्र प्रवास केल्याचा किस्सा सांगितला.
खासदारांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल : डॉ. कुरेशी
निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी म्हणाले, संसदेत सुसंवादापेक्षा, चर्चेपेक्षा विरोध अधिक दिसतो. मात्र जेव्हा चर्चा होते, तेव्हा ती ऐकताना अभिमान वाटतो. लोकमत खासदारांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. पार्लमेंटरी अवॉर्डसारख्या उपक्रमांमुळे
अवॉर्डमुळे लोकशाही अधिक बळकट होईल : डॉ. विजय दर्डा
समारंभाच्या प्रास्ताविकात लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा म्हणाले, या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. कारण, टीकेसोबतच सकारात्मक प्रेरणा देणेही माध्यमांची जबाबदारी आहे. २०१७ पासून लोकमत पार्लमेंटरी अवॉर्डची ही परंपरा अखंड सुरू असून यातून लोकशाही मजबूत होण्यास हातभार लागेल.