जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:52 IST2019-12-17T18:49:49+5:302019-12-17T18:52:51+5:30
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वातावरण पेटलं

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली: जामिया मिलिया विद्यापीठातील हिंसक आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपींना त्यांच्या पार्श्वभूमीवरुन ताब्यात घेण्यात आल्याचा युक्तिवाद यावेळी बचाव पक्षाकडून करण्यात आला.
आरोपींविरोधात याआधीही गुन्हे दाखल झाले होते का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. त्यावर आरोपी याआधी अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपी होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. पोलिसांनी जामिया हिंसाचार प्रकरणात १० जणांना अटक केली होती. यामधील एकही जण विद्यार्थी नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी आम आदमी पार्टीचा एक आमदार आणि काही इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Delhi's Saket Court sends all 6 accused, in connection with Jamia Millia Islamia incident, to 14-day judicial custody.
— ANI (@ANI) December 17, 2019
पोलिसांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून मारहाण आणि गोळीबार केल्याचा आरोप जामियाच्या विद्यार्थ्यांनी केला होता. घटनास्थळावर एक काडतूस सापडल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली होती. मात्र पोलिसांकडून गोळीबार झाल्याचा आरोप त्यानं फेटाळला. पोलिसांकडे रबराच्या गोळ्यादेखील नव्हत्या, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. रविवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी एक बस पेटवून देण्यात आली. यानंतर पोलिसांनी पूर्वपरवानगीशिवाय विद्यापीठ परिसरात प्रवेश करुन कारवाई केली.