द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:50 IST2026-04-11T06:49:33+5:302026-04-11T06:50:41+5:30
उदयनिधी स्टॅलिन चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत

द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
चेन्नई: द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते व उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शुक्रवारी चेन्नईच्या आपल्या चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघात रोड-शो केला. ते या मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
द्रमुकच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या (एसपीए) उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करत असलेले उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, स्वतः उमेदवार असूनही राज्यात ‘द्रविड मॉडेल २.०’ सरकार स्थापन करण्यासाठी ते राज्यभर आघाडीसाठी मते मागत आहेत.
उदयनिधी यांनी प्रचारादरम्यान जनतेला आवाहन केले की, द्रमुकच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवणे म्हणजेच ‘माझा विजय निश्चित करणे’ आहे. आपण स्वत: निवडणूक लढवत असलो तरी अद्याप मतदारसंघात पूर्ण क्षमतेने प्रचार सुरू केला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
करुणानिधींचा मतदारसंघ
शुक्रवारी ज्या भागांत उदयनिधींनी रोड-शो केला त्याच मतदारसंघातून त्यांचे आजोबा आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९९६, २००१ आणि २००६ मध्ये सलग तीन वेळा विजय मिळवला होता. उदयनिधींनी २०२१ची निवडणूक जिंकण्यापूर्वी द्रमुकचे जे. अनबलगन यांनी २०११ मध्ये आणि २०१६ मध्ये ही जागा जिंकली होती.
‘अण्णाद्रमुकमध्ये वैयक्तिक हल्ल्यांची परंपरा’, कनिमोळींवरच्या वक्तव्यावरून द्रमुक आक्रमक
अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामींनी द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्याबाबत केलेल्या कथित अवमानकारक टिप्पणीबद्दल द्रमुक नेत्यांनी शुक्रवारी पलानीस्वामींवर हल्ला चढवला. अशा वक्तव्यांतून त्यांच्यात दडलेली पराभवाची भीती दिसून येते. हे विरोधी पक्षनेते निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहतील याची चिंता त्यांना सतावत आहे, असे द्रमुकने म्हटले.
कनिमोळींनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर विश्वास ठेवणे सुरूच ठेवले तर त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावे लागेल, असे वक्तव्य पलानीस्वामींनी केले होते. २०११ मध्ये २-जी स्पेक्ट्रम प्रकरणात त्यांना अटक झाली होती. निर्णय घेण्याची क्षमता कनिमोळींकडे नाही, जबाबदारी नसताना त्या बोलत असतात असे पलानीस्वामी म्हणाले होते.