नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रॉनिक्स व ऑटोमोबाईलसारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मशिन्स आणि सुट्या भागांची डिलिव्हरी करणे चीनने थांबविले आहे. भारतात आयफोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉनने भारतातील त्यांच्या ३०० हून अधिक चिनी इंजिनीअर्स आणि टेक्नेशियन्स यांना परत बोलावण्याचे आदेश दिले आहेत. ॲपलच्या उत्पादनालाही याचा फटका बसणार आहे. भारताच्या विकासामुळे चीनला जळजळ होत असल्याचे यातून स्पष्ट आहे.
चिनी कर्मचाऱ्यांची संख्या १% पेक्षा कमी आहे; परंतु उत्पादन आणि गुणवत्ता व्यवस्थापनसारख्या कामांत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. चिनी सरकारने नागरिकांना परत बोलाविल्याने कारखान्यांतील कामकाज मंदावू शकते.
चीन कदाचित भारतासोबत ‘टिट-फॉर-टॅट’ रणनीती स्वीकारत आहे, कारण त्यांच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना व्यवसाय व्हिसा मिळविण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. उद्योगातील एका उद्योग सूत्राने सांगितले की, आम्ही या प्रकरणावर सरकारला अहवाल पाठविण्याची योजना आखत आहोत.
‘चिनी गॅरंटी’ला ‘एक्सपायरी डेट’ नाही
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या चीनबाबतच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले आणि या सरकारच्या ‘चिनी गॅरंटी’ला ‘एक्सपायरी डेट’ नाही असा टोमणा मारला.
यामुळे भारताला कसा फटका बसेल?
ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी चिनी असेंब्ली कामगारांच्या कौशल्याची प्रशंसा केली होती. भारतातून त्यांना काढून टाकल्याने स्थानिक कामगारांच्या प्रशिक्षणाची गती मंदावेल तसेच चीनमधून उत्पादन तंत्रज्ञानाचे हस्तांतरण कमी होईल.
ज्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. यामुळे भारतातील उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही; परंतु असेंब्ली लाईनवरील कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा बदल ॲपलसाठी मोठा फटका आहे, कारण ते भारतात नवीन आयफोन १७ चे उत्पादन वाढविण्याची तयारी करत आहेत.