चिमुरडीवर बलात्कार; आरोपी अटकेत
By Admin | Updated: July 21, 2014 02:21 IST2014-07-21T02:21:27+5:302014-07-21T02:21:27+5:30
येथील एका शाळेत सहावर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अखेर रविवारी एका स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली

चिमुरडीवर बलात्कार; आरोपी अटकेत
बंगळुरू : येथील एका शाळेत सहावर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अखेर रविवारी एका स्केटिंग प्रशिक्षकास अटक केली. मुस्तफा असे या आरोपीचे नाव असून त्याच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे कर्नाटकच्या राजधानीमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता.
या घटनेविरुद्ध गेले काही दिवस सातत्याने निदर्शने होत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह सरकारवरील दबाव वाढला होता. बंगळुरूचे पोलीस आयुक्त राघवेंद्र औंधकर यांनी मुख्य आरोपी मुस्तफा याच्या अटकेची आज घोषणा केली. तत्त्पूर्वी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर मुख्य आरोपी मुस्तफा (३१) याला अटक करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रणव मोहंती यांनी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते, असेही त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
२ जुलै रोजी घडलेल्या व १४ जुलै रोजी उजेडात आलेल्या या भयंकर घटनेतील ही पहिलीच अटक आहे. पोलिसांनी मुस्तफा याच्याकडून एक मोबाईल जप्त केला असून त्यात या चिमुरडीची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आली आहेत, असे औंधकर यांनी सांगितले. मूळचा दरभंगा, बिहार येथील रहिवासी असलेला मुस्तफा गेल्या २० वर्षांपासून बंगळुरूत वास्तव्याला आहे. आरोपीला सोमवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)