काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 05:27 IST2025-12-22T05:27:03+5:302025-12-22T05:27:24+5:30
अनेक उंच भागांत बर्फवृष्टी तर पठारावर पर्जन्यवृष्टी; उत्तर भारतही गारठला; अनेक राज्यांत शाळांना सुटी; धुक्याने जनजीवन विस्कळीत

काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा ४० दिवसांचा हंगाम ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ झाला असून, उंचीवरील प्रदेशात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. विशेषत: उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्लातील गुलमर्गमध्ये सुमारे दोन इंच बर्फ पडला.
श्रीनगर-कारगील महामार्गावर सोनमर्गमध्येही रविवारी सकाळपासून बर्फवृष्टी सुरू असून नियंत्रण रेषेवर शनिवारी रात्रीपासून सुमारे सहा इंच बर्फ पडला आहे. श्रीनगरसह काश्मीर खोऱ्याच्या इतर भागांत रात्रीपासून हलका पाऊस सुरू आहे. येत्या दोन दिवसांत बर्फवृष्टी आणखी वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
थंडीचे असे तीन हंगाम
कडाक्याच्या थंडीचा ‘चिल्ला-ए-कलां’ हंगाम ३० जानेवारीला समाप्त होईल. त्यानंतर ‘चिल्ला-ए-खुर्द’ हा कमी थंडीचा तर, त्यानंतर ‘चिल्ला-ए-बच्चा’ हा हलक्या थंडीचा हंगाम सुरू होईल.
दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेशापर्यंत थंडी व धुक्याचा परिणाम जाणवत असून, या बहुतांश राज्यांत सकाळच्या वेळी असलेल्या शाळांना तात्पुरती सुटी जाहीर करण्यात आली आहे.
राजधानी क्षेत्रात प्रदूषण अति गंभीर स्थितीत
नवी दिल्ली : रविवारचा दिवस दिल्लीवासियांना प्रचंड त्रासाचा ठरला. थंडी आणि धुक्यासह प्रदूषणामुळे नागरिक हवालदिल झाले. सकाळी राजधानी क्षेत्रात हवेच्या शुद्धतेचा सूचकांक अत्यंत वाईट श्रेणीत म्हणजे ३८६ एक्यूआय इतका नोंदला गेला. काही केंद्रांवर तो ४००हून अधिक नोंदला गेला. या दाट धुक्यामुळे दिल्लीहून निघणारी १२९ विमाने रद्द करण्यात आली. तर, २००हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. दिल्लीतून रोज होणाऱ्या १३०० उड्डाणांपैकी सकाळ व संध्याकाळच्या उड्डाणांवर धुक्याचा अधिक परिणाम झाला.
धुक्याचा ‘यलो अलर्ट’
उत्तरेतील अनेक राज्यांत ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात १ ते १.५ अंशाची वाढ झाली असली तरी धुक्यामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.
दिल्लीत धुक्याचा ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत सकाळच्या वेळी दृष्यमानता ५० ते १०० मीटर राहण्याची शक्यता आहे.
रेल्वेसेवा विस्कळीत
दाट धुक्यामुळे शताब्दी, ‘वंदे भारत’सह ३५हून अधिक रेल्वे विलंबाने धावत आहेत. राजधानी, दुरांतो एक्स्प्रेस तब्बल दहा तास विलंबाने धावत आहेत.
देशभरातील स्थिती
झारखंडमध्ये थंडीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, बहुतांश जिल्ह्यांत तापमान १० अंशांच्या खाली राहील.
हरियाणात नारनौलमध्ये किमान तापमान ५.२ अंश नोंदले गेले. चंडीगडमध्ये पारा ८.८ अंशांवर होता.
राजस्थानात बहुतांश जिल्ह्यांत तापमान अजूनही १० अंशांच्या खाली आहे.