ऑक्टोबरमध्ये दिली जाणार 12 वर्षांवरील मुलांना लस ? सरकारने आखली योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:43 IST2021-08-25T19:42:44+5:302021-08-25T19:43:46+5:30
Corona in india: सुरुवातीला गंभीर आजार असलेल्या मुलांना लस दिली जाईल, त्यानंतर इतर मुलांना लस मिळेल.

ऑक्टोबरमध्ये दिली जाणार 12 वर्षांवरील मुलांना लस ? सरकारने आखली योजना
नवी दिल्ली: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्याची योजना सरकार आखत आहे. देशात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुलं आहेत, पण सर्वात आधी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना कोरोना लिस दिली जाणार आहे. DCGI कडून 12 वर्षे आणि त्यावरील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळाली असून, Zydus Cadila ची लस Zycov-D या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना देण्याची योजना आहे.
केंद्र सरकारने स्थापन केलेली कोविड वर्किंग ग्रुप कमिटीचे अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा यांच्या मते, कंपनीनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून Zycov-D लसीकरण प्रोग्राममध्ये सामील होईल. सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली जात आहे, परंतु लवकरच मुलांना देखील ही लस दिली जाईल.
आधी आजारी मुलांचे लसीकरण
दरम्यान, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची अशी मुलं, जी गंभीर आजारानं ग्रस्त आहेत, अशा मुलांना सर्वात आधी लस दिली जाईल. निरोगी मुलांना मार्च 2022 पर्यंत लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठक लवकरच आयोजित केली जाईल, ज्यामध्ये गंभीर आजारांच्या श्रेणीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश करायचा, याची यादी तयार केली जाईल.