दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. अपघातात जीव गमावलेल्यांपैकी बरेच जण बिहारचे आहेत. या चेंगराचेंगरीत वैशाली जिल्ह्यातील एका १२ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर येथील नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. तिथे गर्दीत गुदमरल्याने आणि स्टेशनवर चेंगराचेंगरीमुळे त्याचाही मृत्यू झाला. पाटेपूर दाभाईच येथील संजीत पासवान आणि कमलेश यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान नीरजला त्याच्या काका आणि काकूंनी त्यांना मुल नव्हतं म्हणून दत्तक घेतलं आणि त्यांच्यासोबत दिल्लीला आणलं.
नीरजचं दिल्लीतील एका शाळेत ही त्याचं एडमिशन घेण्यात आलं होतं. तो अभ्यासातही हुशार होता. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि अवघ्या ३ महिन्यांनंतर दिल्लीहून घरी परतत असताना नीरजचा या घटनेत मृत्यू झाला.
अपघात आणि स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे गर्दीत अडकलेले काका-काकूही जखमी झाले. नीरजच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि गावामध्ये शोककळा पसरली आहे. नीरजचे वडील संजीत पासवान यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे आणि यामागे गैरव्यवस्थापन हे कारण असल्याचं म्हटलं आहे.
दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर यांनी सांगितलं की, घटनेच्या वेळी पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म १५ वर उभी होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी होती आणि अनेक प्रवासी पडले. ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून केली जात आहे.