‘ड्रगलॉर्ड’ला सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी भाग पाडले, महिला पोलीस अधिकाऱ्याचा शपथेवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:11 AM2020-07-17T05:11:22+5:302020-07-17T06:40:19+5:30

वृंदा या मणिपूर पोलीस सेवेतील अधिकारी असून, त्यांना उत्कृष्ट सेवा व शौर्याबद्दल यापूर्वी अनेक पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.

The Chief Minister forced the release of ‘Druglord’, a female police officer accused of swearing | ‘ड्रगलॉर्ड’ला सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी भाग पाडले, महिला पोलीस अधिकाऱ्याचा शपथेवर आरोप

‘ड्रगलॉर्ड’ला सोडण्यास मुख्यमंत्र्यांनी भाग पाडले, महिला पोलीस अधिकाऱ्याचा शपथेवर आरोप

Next

इंफाळ : मणिपूरचे भाजपचे मुख्यमंत्री एन. बिरेंद्र सिंग यांच्या पत्नी आॅलिस यांचा अत्यंत विश्वासू व निकटवर्ती असलेल्या एका व्यक्तीस आपण दोन वर्षांपूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी रंगेहाथ अटक केली होती; परंतु त्यामुळे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी संतापल्या आणि त्यांनी आपल्यावर प्रचंड दबाव आणून त्या कथित तस्कराविरुद्ध न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र मागे घेऊन त्याला सोडून देण्यास आपल्याला भाग पाडले, असा आरोप मणिपूरमधील एक तरुण महिला पोलीस अधिकारी थौनावोजाम वृंदा यांनी केला आहे.

वृंदा या मणिपूर पोलीस सेवेतील अधिकारी असून, त्यांना उत्कृष्ट सेवा व शौर्याबद्दल यापूर्वी अनेक पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे. मणिपूर पोलीस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या त्या प्रमुख आहेत. तस्करीप्रकरणी अटक केलेल्या या ‘ड्रगलॉर्ड’ला जामिनावर सोडण्यात आल्यानंतर त्यावर टीका करणारे भाष्य त्यांनी फेसबुकवर टाकले होते. त्याबद्दल येथील ‘एनडीपीएस’ न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) कारवाई प्रस्तावित केली आहे. त्याच्या उत्तरादाखल न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वृंदा यांनी हा सनसनाटी आरोप केला असून, अटकेपासून सुटकेपर्यंतचा तारीखवार घटनाक्रम त्यांनी त्यात दिला आहे.

वृंदा म्हणतात की, अटक केलेली व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची अत्यंत निकटवर्ती असल्याचे व मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी खूप संतापलेल्या असल्याने न्यायालयातील आरोपपत्र बिनशर्त मागे घेऊन त्याला सोडून दिले जावे यासाठी भाजपचा एक नेता, राज्याचे पोलीस महासंचालक व इंफाळचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत खूप दबाव आणून आपला पिच्छा पुरविला गेला. तरीही आपण बधलो नाही, तेव्हा स्वत: पोलीस महासंचालकांनी त्या प्रकरणातील विशेष पब्लिक प्रॉसिक्युटरला हाताशी धरून न्यायालयातील आरोपपत्र पपस्पर मागे घेतले.

कोण आहे हा ‘ड्रगलॉर्ड?’
वृंदा व त्यांच्या पथकाने १९ जून २०१८ च्या रात्री ल्हुखोसेई झोऊ यांच्यासह सात जणांना अटक केली होती. झोऊ हे त्यावेळी चांदेल जिल्हा स्वायत्त परिषदेचे अध्यक्ष होते.
त्यांच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४,५९५ किलो हेरॉईन, अमली पदार्थाच्या २.८० हजार गोळ्या, ५७.१८ लाख रुपयांची रोकड व बाद झालेल्या चलनातील ९५ हजार रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या गेल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आॅलीस यांचेही चांदेल हेच मूळ गाव आहे. अटकेनंतर सुमारे सहा महिन्यांनी झोऊ यांच्यावरील आरोपपत्र मागे घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे झोऊ सुटल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते; पण त्यावेळी सरकारच्या प्रसिद्धी विभागाने अधिकृत पत्रक काढून त्याचा इन्कार केला होता.

Web Title: The Chief Minister forced the release of ‘Druglord’, a female police officer accused of swearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस