अजब! भोलेनाथांना कोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस; सुनावणीस गैरहजर राहिल्यास १० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 13:30 IST2022-03-23T13:27:44+5:302022-03-23T13:30:12+5:30
रायगड जिल्ह्यातील तहसीलदार न्यायालयाकडून भगवान शंकरांना नोटीस

अजब! भोलेनाथांना कोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस; सुनावणीस गैरहजर राहिल्यास १० हजारांचा दंड
रायगढ: छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील तहसीलदार न्यायालयानं भगवान शंकरासह १० जणांविरोधात नोटीस काढली आहे. सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गैरहजर राहिल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप भगवान शंकरांवर आहे.
भगवान शंकरांना नोटीस देण्याची घटना छत्तीसगडमध्ये दुसऱ्यांदा घडली आहे. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये जांजगीर-चांपा जिल्ह्यातील सिंचन विभागानं भोलेनाथांना नोटीस बजावून जागा रिकामी करण्यास सांगितलं होतं. यानंतर आता रायगढमधील तहसीलदार न्यायालयानं भगवान शंकरांसह १० जणांविरोधात नोटीस काढली आहे.
रायगढ शहरातील वॉर्ड क्रमांक २५ कौहकुंडामध्ये एक शिवमंदिर आहे. सरकारी जमिनीवर असलेल्या मंदिराप्रकरणी सुधा राजवाडे यांनी विलासपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी शिवमंदिरासह १६ जणांवर जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केला. राज्य शासन आणि तहसीलदार कार्यालयानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले.
यानंतर तहसील कार्यालयानं १० लोकांना नोटीस बजावली. कब्जेदारांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर शिवमंदिराचं नाव आहे. विशेष म्हणजे नोटिशीत मंदिराच्या विश्वस्तांचा, व्यवस्थापकांचा, पुजाऱ्यांचा उल्लेख नाही. नोटीस थेट शिवमंदिराला म्हणजेच भगवान शंकरांनाच पाठवण्यात आली आहे.
तुम्ही केलेलं कृत्य अपराधाच्या श्रेणीत मोडतं, असं तहसीलदार न्यायालयानं नोटिशीत नमूद केलं आहे. न्यायालयासमोर हजर व्हा, अन्यथा १० हजारांचा दंड आकारण्यात येईल आणि तुम्हाला कब्जा केलेल्या जमिनीतून बेदखल केलं जाईल, असा इशाराच नोटिशीमधून देण्यात आला आहे. जमीन महसूल कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचा उल्लेख नोटिशीत आहे.