रायपूर : छत्तीसगडमध्ये आम्हाला दोन तृतियांश बहुमत मिळेल, असे मी सतत सांगत होतो. पण त्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हते. एक्झिट पोलचे निष्कर्षही आमच्या बाजूने नव्हते. पण मला मनापासून स्पष्ट बहुमताची खात्री होती. पण येथील जनतेने आम्हाला दोन तृतियांशपेक्षाही अधिक जागा दिल्या आहेत. तितक्या मिळतील, असे मात्र मला वाटत नव्हते... हे उद्गार आहेत छत्तीसगडकाँग्रेसचे अध्यक्ष भूपेश बाघेल यांचे.छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आणण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर सोपवली होती. ती पूर्ण पाडण्यात यश आल्याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. भाजपाचा दारूण पराभव होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक आहे अजित जोगी यांचा पक्ष. जोगी काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते. त्यांनी बसपाशी समझोता केला असला तरी ते मीच पुढील मुख्यमंत्री होणार, असे सांगत होते. आपल्याला बहुमत न मिळाल्यास जोगींना मुख्यमंत्री होण्यासाठी आपण पाठिंबा द्यायचा, असे भाजपाचे गणित होते. पण जनतेने काँग्रेसला विजयी करून सगळी गणिते फोल ठरवली.
‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पाच वर्षे धोका नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:35 IST