Cardiac Surgeon dies of Heart Attack : कधी डान्स करताना, तर कधी व्याया करताना....गेल्या काही काळापासून कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. खासकरुन तरुणांचा यामुळे अकाली मृत्यू होत आहे. आता चक्क हृदयरोग तज्ञाचाच यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमधील युवा हृदयरोगतज्ञ डॉ. ग्रॅडलिन रॉय यांचे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. ते फक्त 39 वर्षांचे होते.
हृदयरोगाने ग्रासलेल्या अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरलाच हृदयविकाराने गाठल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टरांनी रुग्णांना काळजी घेण्याचे सल्ले देण्यासोबतच, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. धक्कादायक म्हणजे डॉ. रॉय यांचा रुग्णांची सेवा करत असतानाच हॉस्पिटलमध्येच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात तपासणी करत असताना ते अचानक कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण सर्वांचे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले. डॉ. रॉय हे चेन्नईतील सविता मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिअॅक सर्जन म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.