Chemistry Professor Mamta Pathak: छतरपूर येथील केमीस्ट्रीच्या प्राध्यापक ममता पाठक यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ममता यांच्यावर आपल्या पतीच्या हत्येचा आरोप आहे. ममता पाठक यांचा हा खटला खूप चर्चेत आला होता. विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र शिकवणाऱ्या ममता यांनी कुठल्याही वकीलाच्या मदतीशिवाय स्वतःचा खटला लढवला होता.
काय आरोप?सरकारी डॉक्टर नीरज पाठक यांची २०२२ मध्ये हत्या करण्यात आली होती. नीरज पाठक यांचा त्यांच्या पत्नी ममता यांच्याशी बराच काळ वाद सुरू असल्याचे तपासात उघड झाले. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना नीरज पाठक यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचा संशय होता. मात्र, फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टम रिपोर्ट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. काही काळानंतर तपास अधिकाऱ्यांनी पत्नी ममता पाठकवर हत्येचा आरोप केला.
जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे ममता पाठक यांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, ममता यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. ममता यांनी न्यायालयात अतिशय आत्मविश्वासाने स्वतःचा खटला सादर केला. त्यांचा एक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता, ज्यात त्या न्यायालयाला सांगतात, थर्मल आणि इलेक्ट्रिक बर्न्स सारखेच दिसतात. केवळ रासायनिक विश्लेषण करूनच दोघांमधील फरक सांगता येतो. हे उत्तर ऐकून न्यायालयात उपस्थित सर्वांजण चकीत झाले होते. मात्र, तपासाअंती ममता यांनीच पतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.