चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:09 AM2023-08-24T07:09:19+5:302023-08-24T07:09:53+5:30

चंद्राला गवसणी घातली तो ऐतिहासिक दिन

Chandrayaan 3 Journey From India to Moon after Completing 3,84,400 km walk ISRO | चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

चांदाेमामाच्या घरी असा पाेहाेचला भारत... 3,84,400 किमीचा प्रवास 'सुपरहिराे'सारखा केला पूर्ण

googlenewsNext

भारताचे चंद्रयान 3 चंद्रावर बुधवारी यशस्वीरित्या उतरले. रशियाचे लुना २५ हेदेखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते, परंतु रविवारी ते क्रॅश झाल्याने अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

चंद्रावर पोहोचण्याचा भारताचा प्रवास असा झाला...

  • ११ जुलै २०२३ - चंद्रयान-३ चे प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या २४ तासांतील प्रक्रियेची रंगीत तालीम पार पडली.
  • १३ जुलै २०२३ - प्रक्षेपणासाठी २५ तास ३० मिनिटांचे काउंटडाऊन सुरू.
  • १४ जुलै २०२३ - चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा तामिळनाडू, भारत दुपारी २.३५ | प्रक्षेपक एलव्हीएम ३-एम४ | उंची : ४३.५ मीटर, व्यास: ४ मीटर, एकूण वजन: ३,९०० किलो
  • १५ जुलै २०२३ - पृथ्वीच्या भोवतीच्या पहिल्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश. ४१,७६२ किमी x १७३ किमी कक्षेत चंद्रयान-३ ची भ्रमंती.
  • १७ जुलै २०२३ - दुसऱ्या कक्षेत प्रवेश. ४१,६०३ x २२६ किमी 
  • १८ जुलै २०२३ - तिसऱ्या कक्षेत प्रवेश. ५१,४०० x २२८ किमी 
  • २० जुलै २०२३ - चौथ्या कक्षेत प्रवेश. ७१,३५१ किमी x २३३ किमी 
  • २५ जुलै २०२३ - पाचव्या कक्षेत यशस्वी प्रवेश. १,२७,६०३ x २३६ किमी कक्षेतून मार्गक्रमण.
  • १ ऑगस्ट २०२३ - चंद्रयान-३ चा चंद्राभोवतीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश. २८८ किमी x ३,६९,३२८ किमी कक्षेतून भ्रमंती
  • ५ ऑगस्ट २०२३ - चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश. १६४ किमी x १८,०७४ किमीतून भ्रमंती.
  • ६ ऑगस्ट २०२३ - तिसऱ्या कक्षेत प्रवेश. १७० किमी x ४,३१३ किमी कक्षेतून मार्गक्रमण. चंद्रयान-३ ने टिपली चंद्राची पहिली छबी. त्याचा व्हिडीओ इस्रोने जारी केला.
  • ९ ऑगस्ट २०२३- चौथ्या कक्षेत प्रवेश करत चंद्रापासून केवळ १७४ किमी x १,४३७ किमी इतक्या कमी अंतरावर आमगन.
  • १० ऑगस्ट २०२३- चंद्रयान-३ वरील लॅंडर इमेजर कॅमेऱ्याने पृथ्वीचे छायाचित्र टिपले.
  • १४ ऑगस्ट २०२३- चंद्रापासून अवघ्या १५१ किमी x १७९ किमी कक्षेतून भ्रमंती.
  • १६ ऑगस्ट २०२३ - शेवटच्या आणि पाचव्या कक्षेत प्रवेश करत चंद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५३ किमी x १६३ किमी अंतर दूर
  • १७ ऑगस्ट २०२३ - प्रोपल्शन मॉड्युलपासून लॅंडर मॉड्यूल यशस्वीरीत्या वेगळे झाले.
  • १८ ऑगस्ट २०२३ - लॅंडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने (एलपीडीसी) चंद्राची दुर्मीळ छायाचित्रे छायाचित्रे टिपली. परिभ्रमण कक्षा कमी करत चंद्रापासून अवघ्या ११३ x १५७ किमी अंतरावर.
  • २१ ऑगस्ट- चंद्रयान-३ वरील लँडर हझार्ड डिटेक्शन अँड अव्हॉडन्स कॅमेऱ्याने चंद्राच्या दूरवरच्या भागाची छायाचित्रे पाठवली.
  • २३ ऑगस्ट -यशस्वी लँडिंग


दक्षिण ध्रुवाचा  आग्रह कशासाठी?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, सूर्य क्षीतिजाखाली किंवा अगदी वर असतो. त्यामुळे सूर्यप्रकाशावेळी चंद्रावरील तापमान ५४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. तरीही काही भाग कायमस्वरूपी सावलीत असतात. त्यांनी कित्येक वर्षांपासून सूर्यप्रकाश पाहिला नाही. तेथील तापमान -२३० अंश सेल्सिअस इतके कमी असते. आधुनिक सेन्सर्सचा वापर करून चंद्रावर उतरणाऱ्या लॅंडरवरूनही दक्षिण ध्रुव कसा दिसतो, हे सांगणे कठीण असते.

चंद्रयान-३ वेगळे का आहे?

  • एलव्हीएम३-एम४ या अत्याधुनिक प्रक्षेपकाचा वापर
  • अधिक इंधनक्षमतेमुळे जादा भ्रमंती आणि अधिक प्रवासवेळ
  • लँडिंग स्टँड तुलनेने अधिक मजबूत आणि सुरक्षित 
  • अद्ययावत सेन्सर आणि मोठ्या सोलार पॅनलमुळे अधिक ऊर्जानिर्मिती
  • लेझर डॉपलर व्हेलोसीमीटर'मुळे अचूक वेग मोजण्याची क्षमता
  • अद्ययावत अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअर
  • पूर्वीच्या ५०० मीटर x ५०० मीटरतुलनेत ४ किमी x २.५ किमी क्षेत्र लँडिंगसाठी निश्चित
  • प्रोपल्शन मॉड्युलमधील स्पेक्ट्रो पोलॅरीमेट्री ऑफ हेबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) या पेलोडमुळे अवकाशातील अन्य छोट्या ग्रहांचा अभ्यास भविष्यातही केला जाईल.


रोव्हर किती वेगाने चालणार?

लँडिंग झाल्यावर विक्रम लॅंडरमधून सहा पाय असलेला प्रग्यान रोव्हर बाहेर पडला. अगदी एक सेंटीमीटर प्रतिसेकंद वेगाने रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून मार्गक्रमण करत आहे. चंद्रावरील एक दिवस हा १४ दिवसांचा आहे. त्यानुसार रोव्हरचे आयुर्मानही १४ दिवस निश्चित केल्याने या काळात ते केवळ ५ मीटरचे अंतर पार करू शकेल, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे; परंतु पुढील १४ दिवसांनी दिवस उजाडल्यानंतर रोव्हर पुन्हा एकदा काम करू शकेल, असाही अंदाज वर्तविला जात आहे. परंतु सुरुवातीच्या १४ दिवसांमध्ये मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असेल, असे म्हटले जाते.

आतापर्यंत चंद्राबाबत काय माहिती मिळाली?

  • चंद्राचा पृष्ठभाग हा खडकसदृश असून, पृष्ठभागाखालील भाग हा अन्य ग्रहांसारखा आहे.
  • चंद्रावरील काही खडक हे पृथ्वीवरील प्राचीन खडकांपेक्षाही अनेक वर्षे जुने आहेत.
  • चंद्राचा पृष्ठभाग हा सर्वच ठिकाणी एकसमान नसून काही ठिकाणी जाड, तर बहुतांश भाग हा बेसॉल्ट खडकाचा आहे.
  • चंद्रावरील खडकांची निर्मिती ही उच्च तापमानाच्या लाव्हारसातून झाली असून खडकांमध्ये पाण्याचा कुठलाही अंश नाही.
  • मंगळ ग्रहाच्या तुलनेत चंद्रावरील वातावरण कोणत्याही प्रकारच्या लॅंडिंगसाठी कठीण आहे.


चंद्राबाबत एवढं कुतूहल का?

चंद्रयान-१ ने सर्वप्रथम २००८ मध्ये चंद्रावर पाणी असल्याचे म्हटले होते. त्याबाबतचे पुरावे म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर तसेच ध्रुवीय प्रदेशात हायड्रोक्झिल रेणूही आढळले. हायड्रोक्झिल हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा उत्तम स्रोत असून त्याचा रॉकेट फ्यूएल म्हणून वापर होतो.  
पृथ्वीवर दुर्मीळ असलेल्या आणि अणुऊर्जेचा उत्तम पर्याय असलेल्या हेलियमचे चंद्रावर प्रचंड साठे असल्याचे नासाने म्हटले आहे. विशेष म्हणजे हेलियम हे किरणोत्सारी नसल्याने त्यापासून कोणताही धोका उद्भवत नसल्याचे म्हटले जाते.
चंद्रावर स्कॅंडियम, येट्रियमसारख्या अनेक दुर्मीळ धातूंचे साठे आहेत. त्याचा वापर विविध प्रकारच्या गॅजेट्समध्ये केला जातो. 

लॅंडिंग कुठे सोपे?

आतापर्यंत अमेरिका, चीन आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लॅंडिंग केले आहे. सदर भाग लँडिंगसाठी तुलनेने सुरक्षित असून तेथील वातावरणही पोषक असते. परंतु दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. लँडिंगसाठी दक्षिण ध्रुव निवडण्याचे कारण म्हणजे हा भाग उत्तर ध्रुवापेक्षा अधिक मोठा आहे. या भागात पाण्याचे अस्तित्व असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रयान-१ - २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्रयान-१ चे प्रक्षेपण झाले होते. त्याने चंद्रावरील रासायनिक, खनिजीय तसेच भूगर्भीय छायाचित्रे टिपली होती. तसेच चंद्राभोवती सुमारे ३४०० फेऱ्या पूर्ण केल्यानंतर २९ ऑगस्ट २००९ रोजी त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

चंद्रयान-२ - लॅंडरमधील ५ इंजिनांनी निर्माण केलेले जादा वेग, त्रुटी शोधण्यात अपयशी ठरलेले सॉफ्टवेअर आणि लँडिंगसाठी निश्चित केलेली कमी जागा ही चंद्रयान-२ च्या अपयशाची कारणे होती, असे इस्रोने स्पष्ट केले होते. ६ सप्टेंबर २०१९ रोजी लॅंडिंगसाठी अवघी काही मिनिटे शिल्लक असताना चंद्रयान-२ चे विक्रम लॅंडर क्रॅश झाले होते.

आतापर्यंत झालेले सॉफ्ट लँडिंग

  • रशिया - लुना ९ - चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅँडिंग झालेली जगातील ही पहिलीच मोहीम होती. ३१ जानेवारी १९६६ रोजी प्रक्षेपित झालेले लुना ९ अवघ्या चार दिवसांत म्हणजेच ३ फेब्रुवारी १९६६ रोजी चंद्रावर उतरले. पुढे ३ दिवसांत त्याचा संपर्क तुटला.
  • अमेरिका - सर्व्हेयर १ - ३० मे १९६६ रोजी प्रक्षेपित झालेल्या अमेरिकेच्या या मोहिमेत सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आले. सर्व्हेयर १ ने सहा आठवड्याच्या कालावधीत चंद्राची सुमारे ११,१०० छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली होती.
  • चीन - चांग ३ - २ डिसेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित झालेल्या चीनच्या चांग-३ चे १४ डिसेंबर २०१३ ला चंद्रावर यशस्वी लँडिंग पार पडले. त्यातील युतू रोव्हर सुमारे १२ महिन्यांपर्यंत कार्यरत होता.


'विक्रम' लँडर

आयुर्मान- १४ दिवस (एक चंद्रदिवस) | वजन १७४९.८६ किलो (रोव्हरसह) | ऊर्जाक्षमता ७३८ वॉट | पेलोड ३ (रंभा-एलपी, ChaSTE, आयएलएसए) | आकार २००० x २००० x ११६६ घन मिलीमीटर

'प्रग्यान' रोव्हर - आयुर्मान १४ दिवस (एक चंद्रदिवस) | वजन २६ किलो | ऊर्जाक्षमता ५० वॉट | आकार ९१७ x ७५० x ३९७ घन मिलिमीटर

Web Title: Chandrayaan 3 Journey From India to Moon after Completing 3,84,400 km walk ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.