चंद्राबाबूंचे मानसिक संतुलन ढळले - चंद्रशेखर राव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:51 IST2018-12-04T04:51:30+5:302018-12-04T04:51:43+5:30
हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे.

चंद्राबाबूंचे मानसिक संतुलन ढळले - चंद्रशेखर राव
- धनाजी कांबळे
हैदराबाद : हैदराबाद, तेलंगणातील विकासाने तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू अस्वस्थ झाले असून, त्यांनी तेलंगणाचा नाश करण्याचा विडाच उचलला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.
आपणच हैदराबादचा विकास केला, असे चंद्राबाबू सांगतात. नशीब चारमिनारही आपण उभारला, असे ते सांगत नाहीत. अन्यथा कुतूब शहा यांनी आत्महत्या केली असती. त्यामुळे मानसिक संतुलन ढळलेल्या चंद्राबाबूंनी मेन्टल चेकअप करून घ्यावे, असेही केसीआर
येथील प्रचारसभेत म्हणाले. मोदींच्या पंतप्रधान आवास योजनेचा अद्याप कोणत्याच गरीब कुटुंबाला फायदा झाल्याचे दिसले नाही. मात्र, आमचे सरकार गरिबांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, आम्ही सर्व समाजातील गरीब, कष्टकरी जनतेबरोबरच दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळेच या वेळी जनता आम्हालाच संधी देईल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.
केसीआर यांचे पुत्र केटीआर म्हणाले की, काँग्रेसने ६० वर्षांत कोणताच विकास केला नाही. विकास म्हणजे काय, हेच त्यांना माहिती नाही. आता टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी विकास म्हणजे काय ते दाखवून द्यावे. काँग्रेसला टीडीपीने साथ दिल्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. त्यामुळे टीआरएसचे कार्यकर्ते या संधीचे सोने करतील.
>मतांच्या राजकारणात जातोय घुबडांचा जीव
घुबड हे दुर्दैव वा वाईट नशिबाचे प्रतीक आहे, असे अनेकांना वाटते. ती अर्थातच अंधश्रद्धा असली तरी निवडणुकांत समोरच्या उमेदवारांचा विजय होऊ नये, म्हणून अनेक जण घुबडांचा वापर करतात. तेलंगणाही त्याला अपवाद नाही. सध्या अनेक उमेदवारांनी त्यामुळेच घुबडे मागवायला सुरुवात केली आहेत. ती आणली जात आहेत, कर्नाटकातून. घुबडांना मारून टाकायचे आणि त्याचे पंख, शरीर विरोधी उमेदवाराच्या घरासमोर फेकायचे... तसे केले की तो हमखास पराभूत होतो, असा समज आहे.
अलीकडेच कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यात सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घुबडे ताब्यात घेण्यात आली. ती का आणली हा प्रश्न विचारता जी माहिती मिळाली, ती ऐकून पोलीस हबकूनच गेले. ही घुबडे त्यांनी विकायला आणली होती. कर्नाटकात एका घुबडाची किंमत सध्या तीन ते चार लाख रुपये मिळत आहे. कर्नाटकातील जमखिंडी, बेळगाव व बागलकोटमधून ही घुबडे आणण्यात आली होती. ती हैदराबादला नेण्यात येणार होती. अर्थात घुबडांमुळे नशिबाचे फासे उलटे पडत नाहीत आणि हा समज म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण निवडणुकांत विजयासाठी उमेदवार वाटेल त्या पातळीवर जातात, हे या निमित्ताने उघड झाले आहे.