नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. रालोआमधील भाजपाचे दोन मोठे सहकारी असलेले तेलगू देसम पक्ष आणि शिवसेना मोदी सरकारवर नाराज आहेत. या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली असून, या चर्चेमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी घसघशीत तरतूद करण्यात न आल्याने आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत चंद्राबाबू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष रालोआचा सहकारी म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. तसेच चंद्राबाबू यांच्याप्रमाणेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही शिवसेनेमधील सूत्रांनी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर केला होता. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले होते. त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडली होती. तर दुसरीकडे शिवसेना दीर्घकाळापासून भाजपावर नाराज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपाचे दोन मोठे सहकारी रालोआची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा ! मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 10:02 IST