नवी दिल्ली : न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते, असे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई आपल्या निरोपप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले. गोगोई यांनी शुक्रवारी देशभरातल्या उच्च न्यायालयांतील ६५० न्यायाधीश व १५ हजार न्यायदंडाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून एक नवा पायंडा पाडला व त्यांचा निरोप घेतला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) शुक्रवारी आयोजित केलेला निरोप समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी कोणाचेही भाषणे झाले नाही.या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित होते. निरोप समारंभात कोणीही भाषण करू नये, अशी गोगोई यांची इच्छा असल्याचे एससीबीएच्या सचिव प्रीती सिंग यांनी सांगितले. एससीबीएचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी या समारंभाला उपस्थित असलेल्यांचे स्वागत केले. गोगोई हे सर्वोत्कृष्ट सरन्यायाधीशांपैकी एक आहेत, असे खन्ना यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त होत असले तरी आठवडाअखेर आलेल्या सुट्यांमुळे त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. त्यानुसार परंपरेचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयातील दालन क्रमांक एकमध्ये गोगोई भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमवेत बसले. ते तिथे केवळ चार मिनिटे होते. या कालावधीत गोगोई व बोबडे यांच्या खंडपीठाने १० खटल्यांमध्ये नोटिसा जारी केल्या. दुपारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.>ऐतिहासिक महत्त्वाचे निकालसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या काही दिवसांत काही ऐतिहासिक निकाल दिले. गेली अनेक दशके प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमीच्या वादावर गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेला निकाल खूपच महत्त्वाचा होता.कर्नाटकमधील आमदारांना अपात्र ठरविण्याचे प्रकरण, शबरीमलातील आय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा, राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालावरील फेरविचार याचिका, राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप असलेला खटला, अशा प्रकरणांचे त्यांनी निकाल दिले. शबरीमलाचा खटला त्यांनी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला.
''आव्हाने व खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते''
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:20 IST