सरपंच ते पंचायत समिती सभापती
By Admin | Updated: June 3, 2014 01:45 IST2014-06-02T22:03:26+5:302014-06-03T01:45:24+5:30
केरू नाना चुंबळे यांचा जीवनप्रवास

सरपंच ते पंचायत समिती सभापती
केरू नाना चुंबळे यांचा जीवनप्रवास
नाशिक : केरू नाना चुंबळे-पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात नाशिक तालुक्यातील त्यांच्या गौळाणे गावच्या सरपंचपदापासून केली. सलग १५ वर्षे त्यांनी गौळाणे गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली. त्याआधी त्यांनी गौळाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्षपदही काही काळ भूषविले. ते नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक संघाच्या संचालकपदी निवडून आले होते. गेल्या दहा वर्षांपासून ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे २००२ ते २००७ या काळात ते नाशिक पंचायत समितीच्या सभापतिपदी कार्यरत होते. आता जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटातून त्यांची स्नुषा विजयश्री रत्नाकर चुंबळे यांना अपक्ष म्हणून निवडून आणण्यात केरू नाना चुंबळे यांचा सिंहाचा वाटा होता. सालाबादप्रमाणे सप्तशृंगगडावरील कार्यक्रम आटोपून येत असताना त्यांच्यावर नियतीने झडप घातली.
वोक्हार्ट रुग्णालयात गर्दी
केरू पाटील चुंबळे यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वोक्हार्ट रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रकाश वडजे, यतिन पगार, तसेच उदय जाधव, हिरामण खोसकर, विष्णुपंत म्हैसधुणे, सुनील वाजे, संजय सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी वोक्हार्ट रुग्णालयात चुंबळे यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी केरूनाना चुंबळे यांना मयत घोषित केल्यानंतर वोक्हार्ट रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी चुंबळे यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. रात्री उशिरा गौळाणे या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.