‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:22 AM2024-03-13T05:22:55+5:302024-03-13T05:23:24+5:30

अनेकांनी केले समर्थन, देशभरात संमिश्र प्रतिक्रिया

central govt launches portal for caa and petition to the supreme court seeking stay | ‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांचा निकाल जोवर लागत नाही तोवर नागरिकत्व दुरुस्ती नियम २०२४च्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तर, या कायद्यानुसार पात्र असलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा अर्ज करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पोर्टल सुरू केले आहे.

इंडियन युनियन मुस्लिम लीग या संघटनेने या याचिकेद्वारे मुस्लिमांनाही भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. तर, डीवाएफवायने ‘सीएए’च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सीएएद्वारे पात्र व्यक्तींनी भारतीय नागरिकत्वाकरिता अर्ज करण्यासाठी indiancitizenshiponline.nic.in हे पोर्टल मंगळवारपासून सुरू केले आहे. तसेच CAA-2019 या मोबाइल ॲपद्वारेदेखील इच्छुक व्यक्ती आपला अर्ज दाखल करू शकतात. 

काेणती कागदपत्रे हवी?  

- आपण कोणत्या देशाचे रहिवासी आहोत हे सिद्ध करण्यासाठी नऊ प्रकारची कागदपत्रे सादर करता येतील. त्यामध्ये वैध किंवा मुदत संपलेला पासपोर्ट असणार आहे. त्याशिवाय काही ओळखपत्रे, जमिनीची मालकी असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. अर्जदार हा अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे त्या कागदपत्रांतून स्पष्ट होऊ शकते..

- पोर्टलवर व्हिसाची प्रत, भारतात दाखल झाल्याचा इमिग्रेशन स्टॅम्प, सदर व्यक्तीने भारतात ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी प्रवेश केला आहे, असे नमूद करणारे ग्रामीण, शहरी भागातील कोणत्याही लोकप्रतिनिधीचे किंवा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जदाराने सादर करायचे आहे. यासाठी २० कागदपत्रांपैकी कोणतीही उपलब्ध कागदपत्रे द्यायची आहेत. 

असा करा अर्ज

- इंडियन सिटीझनशिप ऑनलाईनच्या वेबसाईटवर साईनअप करुन नाेंदणी करावी.
- भारतीय नागरिकत्त्व प्राप्त करण्यासाठी अर्ज जमा करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
- माेबाईल क्रमांक किंवा इ-मेल आयडी द्या
- नाव, इ-मेल आयटी सबमिट केल्यानंतर माेबाईल व इ-मेलवर ओटीपी प्राप्त हाेईल.
- ओटीपीद्वारे पडताळणी करा. त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू हाेईल.
- अर्जात काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. 
- सर्व माहिती भरल्यांतर ॲक्सेप्ट व सबमिट यावर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलाेड करावी लाागतील. 
- ऑनलाईन प्रक्रीयेसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल.

‘आता आमचे भविष्य सुरक्षित’

सीएएची अंमलबजावणी झाल्याने आता आमचे भारतात भविष्य सुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व दिल्ली येथे राहात असलेल्या हिंदूंनी दिली. तर, ‘सीएए’वरुन देशभरात कुठे विराेध तर कुठे पाठिंबा दिसून आला.

देशभरात संमिश्र प्रतिक्रिया

कोणाही भारतीयाचे नागरिकत्व सीएए कायद्यामुळे रद्दबातल होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू, बौद्ध, शीख, जैन स्थलांतरितांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मानच केला आहे. सीएएप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हे खोटे आरोप करत आहेत, अशी टीका शाह यांनी केली.


 

Web Title: central govt launches portal for caa and petition to the supreme court seeking stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.