शेतकऱ्यांवर कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता; सरकारची संसदेत माहिती
By देवेश फडके | Updated: February 2, 2021 20:15 IST2021-02-02T20:14:07+5:302021-02-02T20:15:48+5:30
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे.

शेतकऱ्यांवर कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे पर्याय नव्हता; सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर सोडत कडक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सरकारने समर्थन केले आहे. लोकसभेत यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले की, आंदोलनादरम्यान शेतकरी सरकारी संपत्तीची नासधूस करण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची दाट शक्यता दिसून येत होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांसमोर मोठी कारवाई करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले
लिखित उत्तरात पुढे म्हटले आहे की, दिल्ली सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसखोरी करण्यासाठी अधिक आक्रमक झाले. सरकारी संपत्तीचे नुकसान केले. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर ईजा झाली. याशिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक नियमांचे पालनही केले नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी मास्कही घातले केले नव्हते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि एकूण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला, असेही या उत्तरात सरकारकडून सांगण्यात आले.
आदोलक शेतकऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या कोणत्याच नियमांचे पालन केले नाही. कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी आतापर्यंत ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका आत्महत्येच्या प्रकरणाचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी दिल्लीतील गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.