सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचा सामूहिक राजीनामा
By Admin | Updated: January 17, 2015 10:17 IST2015-01-17T10:14:30+5:302015-01-17T10:17:32+5:30
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन व इरा भास्कर यांच्या पाठोपाठ बोर्डाच्या इतर सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचा सामूहिक राजीनामा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन व इरा भास्कर यांच्या पाठोपाठ बोर्डाच्या ७ सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. सॅमसन यांच्या समर्थनार्थ इतर सदस्यांनी हे पाऊल उचलले आहे.
डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मंडळाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या. सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचारात गुंतले असून ते कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारला धारेवर धरले. संध्याकाळी बोर्डाच्या सदस्य असलेल्या इरा भास्कर यांनीही राजीनामा देत या संवैधानिक मंडळाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आज सकाळी बोर्डाच्या इतर सदस्यांनी सामूहिक राजीनामा देत सॅमसन यांना पाठिंबा दर्शवला. या सदस्यांमध्ये पंकज शर्मा, राजीव मसंद, शाजी करूण, शुभ्रा गुप्ता, लोरा प्रभू, शेखरबाबू कंचोला व टीजी थायगराजन यांचा समावेश आहे.