नव्या तेलंगण राज्याची वर्षपूर्ती उत्साहात साजरी
By Admin | Updated: June 4, 2015 00:30 IST2015-06-04T00:30:54+5:302015-06-04T00:30:54+5:30
स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला

नव्या तेलंगण राज्याची वर्षपूर्ती उत्साहात साजरी
हैदराबाद : स्वतंत्र राज्यासाठी तब्बल पाच दशकांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र तेलंगणने मंगळवारी आपला पहिला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्थापन करण्यात आलेले तेलंगण हे भारतातील २९ वे राज्य आहे. गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र राज्य निर्मितीच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावणारे तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.
२ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण नावाचे भारताचे २९ वे राज्य उदयास आले होते. या राज्याच्या निर्मितीच्या विरोधात सीमांध्रात हिंसक आंदोलनही करण्यात आले. शेती संकट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यांवरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली असली तरी सत्तारूढ टीआरएसने मागील वर्षभरात अनेक जनकल्याणकारी आणि विकासाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
तेलंगणच्या पुनर्रचनेसाठी कटिबद्ध असलेले मुख्यमंत्री राव यांनी पेयजल, रस्ते बांधणी, महिला सुरक्षा आणि औद्योगिक धोरण आदी क्षेत्रांसाठी अनेक योजना आणि कार्यक्रमांचे उद्घाटन केलेले आहे. त्यात ३ कोटी लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविणारा तेलंगण पेयजल पुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प ३८.५ कोटी रुपये खर्चाचा आहे. याशिवाय राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यात विजेचा तुटवडा होता; परंतु आता राज्यात पुरेशी वीज उपलब्ध आहे आणि राज्य विजेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. तेलंगणला भारतातील ऊर्जा आधिक्य असलेल्या राज्य बनविण्याच्या प्रयत्नात तब्बल ९१ हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात सरकारला यश आले आहे. अन्य राज्यांना वीजपुरवठा करणारे राज्य बनविण्याचा सरकारचा मानस आहे, असे मुख्यमंत्री राव यांनी राज्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.