CBSE board 10th Result 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज बारावीनंतर दहावीचा निकालही जाहीर केला. CBSE दहावीच्या निकालात ९३.६०% विद्यार्थी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.०६% ने वाढले आहे. मुलींनी मुलांपेक्षा २.३७% पेक्षा जास्त पॉईंट्सने आघाडी घेतली आहे. एकूण ९५% मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी एकूण २६६७५ शाळांमधून एकूण २३ लाख ७२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी एकूण ९३.६०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी ९३.६६% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या वर्षी त्रिवेंद्रम आणि विजयावाडा या विभागाचा सर्वाधिक निकाल लागला. या विभागात सर्वाधिक ९९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
- त्रिवेंद्रम – ९९.७९%
- विजयवाडा – ९९.७९%
- बेंगळुरू – ९८.९०%
- चेन्नई – ९८.७१%
- पुणे – ९६.५४%
- अजमेर – ९५.४४%
- दिल्ली पश्चिम – ९५.२४%
- दिल्ली पूर्व – ९५.०७%
- चंदीगड – ९३.७१%
- पंचकुला – ९२.७७%
- भोपाळ – ९२.७१%
- भुवनेश्वर – ९२.६४%
- पाटणा – ९१.९०%
- डेहराडून – ९१.६०%
- प्रयागराज – ९१.०१%
- नोएडा – ८९.४१%
- गुवाहाटी – ८४.१४%
मार्कशीट डिजिलॉकर, उमंग अँपवरही मिळणार!
अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना डिजिलॉकर आणि उमंग अॅपवरही त्यांची मार्कशीट मिळू शकेल. यासाठी तुम्हाला रोल नंबरच्या मदतीने अॅपवर लॉग इन करावे लागेल. तुम्ही तुमच्या मोबाईलवर मार्कशीट डाउनलोड करू शकाल.
गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही
सीबीएसई बोर्ड गुणवत्ता यादी जाहीर करत नाही. याशिवाय, निकालात कोणताही टॉपर घोषित केलेला नाही. मंडळाने सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना कोणत्याही मुलाला शाळा किंवा जिल्ह्याचा टॉपर म्हणून घोषित करू नये, असे निर्देश दिले आहेत.
मूळ मार्कशीट शाळेतून मिळेल...
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाइन तपासू शकतात. परंतु हे केवळ तात्पुरते आहे. विद्यार्थ्यांना त्यांची मूळ गुणपत्रिका त्यांच्या शाळेतून घ्यावी लागेल. पुढील अभ्यासासाठी आणि इतर अधिकृत गोष्टींसाठी मूळ गुणपत्रिका आवश्यक आहे. ती विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावी लागेल.