Caste-Wise Census: काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही काळापासून सातत्याने जातीय जनगणनेची मागणी करत होते. पण, केंद्रातील मोदी सरकार नेहमी या मुद्द्याला बगल देत आली. पण, आता आज(30 एप्रिल) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. सरकारने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळेच आता काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सरकारच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
राहुल गांधींना विरोध का केला?काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणतात की, सरकार नेहमी राहुल गांधींवर जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करण्याचा आरोप करत होते, मग आता सरकार जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करणार का? जेव्हा तुम्हाला (सरकारला) राहुल गांधींची मान्य करायची होती, मग त्यांना विरोध का केला? ही चौथी-पाचवी वेळ असेल, जेव्हा भाजपने आधी राहुल गांधींचा विरोध केला आणि नंतर सहमती दर्शवली.'
'जे लोक राहुल गांधींवर जातींच्या आधारावर लोकांना फूट पाडण्याचा आरोप करत होते, तेच आता याला सरकारचा "मास्टरस्ट्रोक" म्हणतील. सामाजिक न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे जातीय जनगणना. हे फक्त पहिले पाऊल आहे, यासोबतच आणखी अनेक पावले उचलावी लागतील. केवळ आकडेवारी सादर करून सामाजिक न्याय साध्य होणार नाही. राहुल गांधी याबाबत सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया देतील,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.