डोळे पाणावणारी घटना; मृत्यूच्या काही क्षण आधी 'तो' दिलखुलास जगला अन् अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:14 IST2023-02-13T13:14:01+5:302023-02-13T13:14:14+5:30
ऍशलेने ऑक्सिजन सपोर्टवर त्याच्या जीवनातील वाढदिवसाच्या शेवटच्या पार्टीचा आनंद लुटला.

डोळे पाणावणारी घटना; मृत्यूच्या काही क्षण आधी 'तो' दिलखुलास जगला अन् अखेर...
पणजी - आयुष्यात कधी काय होईल हे कुणालाही सांगता येणं कठीण आहे. त्यात जर एखाद्याला आपला मृत्यू काही दिवसांनी होणार आहे हे कळलं तर काय होईल? जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात गोव्यात एका पार्टीचं आयोजन केले होते. लुटोलिमचे प्रमुख धर्मशाला यांची ही भव्य पार्टी होती. फुगे, करोके, संगीत, चिप्स आणि केक सर्व काही होते. लोकांनी पार्टीत डान्स केला, केक कापला आणि खूप धमाल केली.
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या पार्टीतील वातावरण दु:खी होते, तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि कुणालाही उदास राहण्याची परवानगी नव्हती. कारण ही पार्टी २८ वर्षीय ऍशले नोरोन्हा जो कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आयुष्याशी लढत आहे त्याच्यासाठी होती. ऍशलेने पार्टीचा आनंद लुटला. फोटोशूट पूर्ण झाले आणि काही तासांनंतर त्याचा मृत्यू झाला. प्रत्येकानं माझ्या आयुष्यातील आनंद साजरा करावा. कुणीही उदास राहू नये अशी ऍशलेची इच्छा होती.
ऍशलेने त्याच्या आयुष्यातील शेवटचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला शांती अवेदना सदनच्या टीमने लगेच होकार दिला. ऍशलेने ऑक्सिजन सपोर्टवर त्याच्या जीवनातील वाढदिवसाच्या शेवटच्या पार्टीचा आनंद लुटला. त्याच्या नाकात ऑक्सिजनची ट्यूब होती. त्याला पार्टीसाठी तयार करण्यात आले. मेकअपही केला होता. ऍशलेने पार्टीत सगळ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. मनातील सर्वकाही सांगून टाकलं.
म्युझिकचा आवाज वाढवला...
स्पीकरवर सुरू असलेले स्लो टेम्पो म्युझिक बंद करून त्याने पॉप म्युझिक लावले आणि त्याच्या आवडते पेय रम आणि कोक मागवले. मात्र डॉक्टरांनी यासाठी नकार दिला होता. बर्थडे पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ऍशलेनं अखेरचा श्वास घेतला.