-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्लीभारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार याचा फैसला मंगळवारी होणार आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे रालोआकडून तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आमनेसामने आहेत.
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता रालोआच्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. इंडिया आघाडीही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली आहे.
बीजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मतदारांची संख्या ७८१ वर आली आहे. यात लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ खासदार आहेत. बहुमतासाठी ३९१ मतांची गरज आहे. सध्या रालोआकडे ४३६ मते आहेत. तर विरोधी पक्षांकडे ३२४ मते आहेत.
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक कशी होते?
उपराष्ट्रपतिपदाची निवड प्रमाणानुसार प्रतिनिधित्व पद्धतीने आणि एकच हस्तांतरणीय मत प्रणालीने केली जाते.
मतदान कसे केले जाते? : ज्या उमेदवाराला पहिली पसंती द्यायची आहे, त्याच्या नावासमोर ‘१’ हा अंक पसंती क्रम या कॉलममध्ये लिहावा लागतो. कुठेच १ क्रमांक लिहिला नसेल तर मतपत्रिका अवैध ठरते.
पसंतीक्रम कसा दिला जातो? : अंक (१, २, ३) किंवा रोमन पद्धतीने (I, II, III) किंवा कोणत्याही भारतीय भाषेतील अंकांमध्ये लिहिता येतात.
पसंती लिहिण्यासाठी कोणता पेन वापरता येतो? : आयोगाने दिलेले विशेष पेनच वापरावे लागते. इतर पेन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरते.
मतपत्रिका खराब झाली तर..? : स्वतःचे नाव, सही, आद्याक्षरे, ठसा वगैरे काहीही लिहिल्यास मतपत्रिका बाद होते. मतपत्रिका फाटल्यास किंवा खराब झाल्यास नवीन मतपत्रिका दिली जात नाही. पसंती दर्शविण्यासाठी ‘ ’ किंवा ‘ ’ असे चिन्ह वापरता येत नाही.