नवी दिल्ली : देशात मुंबई-अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन धावणार असून, या रेल्वेच्या प्रवासाचे दर जगातील कोणत्याही हायस्पीड रेल्वेच्या तुलनेत स्वस्त राहणार आहेत. जपानची चमू स्वस्त प्रवासदराच्या मॉडेलवर काम करीत असून, या रेल्वेच्या प्रवासाचे दर याच मार्गावरील प्रथमश्रेणी एसीच्या (एसी-१) दरापेक्षा केवळ दीडपट जास्त राहतील.सध्या या मार्गावरील एसी-१चे दर १८९५ रुपये असून, बुलेट ट्रेनचे दर २८०० रुपये राहतील. मुंबई- अहमदाबाद ५३४ कि.मी.चे अंतर पूर्ण करण्यासाठी आठ तास लागतात. बुलेट ट्रेन हे अंतर दोन तासांपेक्षाही कमी कालावधीत पूर्ण करेल. बुलेट ट्रेन १० स्थानकांवर थांबण्याची शक्यता असून, या प्रकल्पावर ९८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.जपानच्या टोहोकू शिन्कानेसनचे (हायाबुसा रेल्वे) दर टोकियो-शिन- आमोरी या ७१३ कि.मी. मार्गासाठी ८ हजार रुपये आहेत. चीनच्या जिंगू हायस्पीड रेल्वेचे बीजिंग-शांघाय मार्गावरील दुसऱ्या श्रेणीचे दर ५ हजार रुपये आहेत. भारतातही प्रारंभी बुलेट ट्रेनचे प्रवासदर एवढेच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र आता ‘फेअर बॉक्स रेव्हेन्यू मॉडेल’वर अभ्यास केला जात असून, जपानच्या चमूने प्रस्तावित कॉरिडॉरचा सर्व्हे केल्यानंतर ताशी ३२० कि.मी. वेगाच्या बुलेट ट्रेनसाठी प्रवास दर कमी ठेवण्याचा विचार समोर आला आहे. त्याबाबत रेल्वे मंत्रालयाला जुलैमध्ये अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था) च्बुलेट ट्रेन २०२३मध्ये सुरू होणार असून, त्या वेळी दररोज ४० हजार लोक या कॉरिडॉरचा वापर करतील. एसी-१ श्रेणीचे त्या वर्षी राहणाऱ्या दराच्या दीडपट दर या प्रवासासाठी आकारला जाण्याची शक्यता आहे. च्त्यापेक्षा जास्त दर आकारले तर विमान प्रवास हा अधिक आकर्षक पर्याय ठरेल. त्यापेक्षा कमी दर आकारला तर महसुलावर परिणाम होईल. बुलेट ट्रेनचे कमी राहणारे दर एअरलाइन्ससोबत ‘फेअर वॉर’ भडकण्याला कारणीभूत ठरतील, असे मानले जात आहे.
‘बुलेट ट्रेन’चे भाडे दीडपट, वेग चौपट!
By admin | Updated: June 5, 2015 01:40 IST