Budget 2020 Income Tax: ...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:09 IST2020-02-01T15:09:09+5:302020-02-01T15:09:15+5:30
Budget 2020 Income Tax : करदात्यांना जुन्या आणि नव्या टॅक्स स्लॅबप्रमाणे कर भरण्याचे पर्याय उपलब्ध

Budget 2020 Income Tax: ...तरच तुम्हाला मिळेल इन्कम टॅक्सच्या नव्या दरांचा फायदा; 'ही' आहे महत्त्वाची अट
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केलं. या बजेटमधून करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल. मात्र यासाठी सरकारनं महत्त्वाची अट घातली आहे. या अटींची पूर्तता केल्यावरच नव्या टॅक्स स्लॅबचा फायदा घेता येईल.
कसे आहेत नवे टॅक्स स्लॅब?
५-७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के
७.५-१० लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के
१०-१२.५ लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के
१२.५-१५ लाखांच्या उत्पन्नावर २५ टक्के
१५ लाखांपेक्षा अधिकच्या उत्पन्नावर ३० टक्के
कशी मिळणार सूट?
नवे टॅक्स स्लॅब ऐच्छिक असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला या सुविधांचा लाभ घ्यायचा असल्यास त्याला आतापर्यंत मिळणाऱ्या सवलती सोडाव्या लागतील. विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या ७० मुद्द्यांच्या आधारे प्राप्तिकरात सवलत मिळते. मात्र नव्या टॅक्स स्लॅबचा फायदा घ्यायचा असल्यास त्यांना या सवलतीवर पाणी सोडावं लागेल. याआधी प्राप्तिकर भरताना या सगळ्या गोष्टींची माहिती दिल्यावर करात सवलत मिळत होती.
कोणाला फायदा? कोणाला तोटा?
एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न ७.५ लाख रुपये असल्यास त्याला सध्या ५० हजार रुपयांचा कर भरावा लागतो. मात्र नव्या टॅक्स स्लॅबनुसार त्याला केवळ २५ हजार रुपयेच कर भरावा लागेल. सध्याच्या नियमांनुसार संबंधित व्यक्ती विम्याचे हप्ते, गुंतवणूक, घर भाडं, मुलांचं शैक्षणिक शुल्क यासारख्या ७० मुद्द्यांची माहिती देत असल्यास त्याला सवलत मिळते. ही सवलत घेऊन भराव्या लागणाऱ्या कराची रक्कम २५ हजारांपेक्षा खाली येत असल्यास जुनाच टॅक्स स्लॅब फायदेशीर ठरू शकतो. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही संबंधित व्यक्तीला २५ हजारांपेक्षा जास्त कर भरावा लागत असल्यास त्याच्यासाठी नवा टॅक्स स्लॅब जास्त फायदेशीर ठरेल. नव्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरताना त्याला कागदपत्रांची पूर्ततादेखील करावी लागणार नाही.