आशियातील सर्वात मोठा बौद्ध मठ असलेले ठिकाण म्हणजे तवांग. अरुणाचल प्रदेशात उत्तर पश्चिम दिशेला हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून हे शहर ३५०० मीटर उंचीवर आहे. कृषिप्रधान असलेल्या या शहरात शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. नैसर्गिक देणगी लाभलेला हा परिसर अतिशय सुंदर आहे. १७ व्या शतकात मिराक लामा यांनी या शहराचे नामकरण केले होते. मोनपा जातीचे आदिवासी येथे राहतात. येथील मुख्य आकर्षण म्हणजे बौद्ध मठ. उंच डोंगरी भागात हा मठ आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची दहा हजार फूट आहे. या भागातून वाहणाऱ्या छोट्या नद्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. या मठाचे प्रवेशव्दार दक्षिणेला आहे. काकालिंग असे प्रवेशद्वाराचे नाव आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर अतिशय सुंदर चित्रकला दिसून येते. भगवान बुद्धाची २८ फुट उंच प्रतिमा पाहून मन प्रसन्न होते. या मठात एक मोठे ग्रंथालयही आहे. प्राचीन आणि पांडु लिपितील साहित्य येथे आहे. असे सांगितले जाते की, मठाच्या निर्मितीसाठी या ठिकाणाची निवड एका घोड्याने केली. ‘ता’ म्हणजे घोडा आणि ‘वांग’ म्हणजे आशीर्वाद. म्हणूनच याला तवांग असे नाव पडले. तवांगपासून चीनची सीमा ३७ किलोमीटर अंतरावर आहे. तो परिसर बम ला पास नावाने ओळखला जातो
तवांगमधील बौद्ध मठ
By admin | Updated: January 17, 2017 05:32 IST