‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:36 IST2025-09-28T05:36:27+5:302025-09-28T05:36:59+5:30
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) स्वदेशी ४जी नेटवर्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.

‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
झारसुगुडा : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) स्वदेशी ४जी नेटवर्कचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले. आपला देश जागतिक दूरसंचार उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने प्रगती करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वदेशी बनावटीची दूरसंचार उपकरणे बनविणाऱ्या डेन्मार्क, स्वीडन, चीन, दक्षिण कोरिया या देशांच्या पंक्तीत पाचवा देश म्हणून आता भारताची वर्णी लागली आहे. बीएसएनएलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशभरातील ९७,५०० हून अधिक ४जी मोबाइल टॉवरचे लोकार्पण ओडिशातील झारसुगुडा येथे झालेल्या समारंभात केले.
२ कोटी लोकांना ४जी सेवेमुळे लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ४जी तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे देशभरात २ कोटींहून अधिक लोकांना थेट लाभ होणार आहे. आजवर हाय-स्पीड इंटरनेटपासून वंचित असलेल्या सुमारे ३०,००० खेड्यांना आता या योजनेमुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
काँग्रेसने कायम लुटले
काँग्रेसने देशातील जनतेला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. इतकेच नाही, कमी उत्पन्न गटातील लोकांवर कर लावला होता, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ओडिशाच्या झारसुगुडा येथे ‘नमो युवा समावेश’ या कार्यक्रमात ते म्हणाले की, काँग्रेस व मित्रपक्षांकडून होणाऱ्या लुटीपासून सतर्क राहिले पाहिजे.
६० हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथून दूरसंचार, रेल्वे आणि उच्च शिक्षण क्षेत्रांतील ६०,००० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. तसेच देशभरातील आठ आयआयटी संस्थांच्या विस्तारासाठी पायाभरणी केली. या संस्थांमुळे पुढील चार वर्षांत आणखी १०,००० विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश देणे शक्य होणार आहे. बेरहामपूर-उधना अमृत भारत एक्स्प्रेस या गुजरात-ओडिशाला जोडणाऱ्या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिरवा कंदील दाखविला. भाजप सरकार २०२४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधानांनी आतापर्यंत सात वेळा ओडिशाचा दौरा केला आहे.